मुळा कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांनी उभारली कष्टाची गुढी चिमुकल्यांसह थोरा-मोठ्यांनी सुट्टी घेत साजरा केला गुढीपाडवा सण

नायक वृत्तसेवा, नेवासा
सध्या गळीत हंगाम चालू असल्याने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची ऊसतोड करण्यासाठी विविध जिल्ह्यांतील मजूर मोठ्या संख्येने आलेले आहेत. ऊन, वारा, पाऊस व थंडीचा कुठलाही विचार न करता पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर कोसो दूर येतात. या कष्टातही कामगारांनी गुढीपाडव्याला मंगळवारी (ता.13) खोप्यावर गुढी उभारुन सणाचा आनंद घेतल्याचे दृश्य नेवासा तालुक्यातील मुळा कारखाना परिसरात पहायला मिळाले.

मंगळवारी सकाळी मुळा कारखाना गट परिसरात भेट दिली असता ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या भागात मोठा आनंदाचा सोहळा पाहण्यास मिळाला. आपापल्या पाचरटाच्या झोपडीसमोर महिला व लहान मुलींसह रांगोळी काढताना दिसल्या. चिमुकले घराच्या परिसरात स्वच्छता करत होते. लहान-मोठ्यांची सुरु असलेली लगबग कौतुकास्पद होती.

रोज पहाटे ऊसतोडणीसाठी दहा ते पंधरा किलोमीटर जावे लागते. उसाने भरलेली बैलगाडी घेऊन कारखान्याकडे येताना हा सारा प्रवास कडक उन्हात होतो. कष्ट आणि उन्हातील प्रवासामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग अजून तरी झालेला नाही, असे नागेश गर्ने यांनी सांगितले. कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी कामगार महत्वाचा दुवा असल्याने मुळा कारखान्याच्यावतीने सर्वांची विशेष काळजी घेतली जाते. गुढीपाडव्याला अनेक ऊसतोडणी कामगारांनी सणाची सुट्टी घेत सण मोठ्या उत्साहात साजरा केला. घरी गोडधोड जेवण करुन मराठी नववर्षानिमित थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. गळीत हंगामनिमित्त सहा ते सात महिने राबणारे आमचे हात घरी गेल्यानंतरही थांबत नाही. घरच्या शेतात कष्टाचा दुसरा भाग सुरु होतो, असे दिनकर राठोड यांनी सांगितले.

Visits: 101 Today: 1 Total: 1107885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *