राहाता येथे घनकचरा प्रकल्पात उभारली गुढी नागरिकांनी सफाई कर्मचार्यांबरोबर केला सण साजरा
नायक वृत्तसेवा, राहाता
येथील नगरपरिषदचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या संकल्पनेतून प्रथमच घनकचरा प्रकल्प येथे आरोग्य विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी सफाई कर्मचार्यांबरोबर गुढी उभारली. त्यांच्या आनंदात सहभाग घेऊन शहरात अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा उत्सव साजरा केला.
याप्रसंगी स्वच्छता विभागाचे प्रमुख रवींद्र बोठे, विजयकुमार आवरे, कैलास खरात व महिला सफाई कामगार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. स्वच्छता विभागाचे प्रमुख बोठे म्हणाले, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या संकल्पनेतून शहराच्या घनकचरा व्यवस्थापन ठिकाणी सफाई कामगारांच्या आनंदात सहभाग घेण्यासाठी विजयाचे प्रतीक म्हणून समजला जाणारा गुढीपाडवा हा सण उत्साहात साजरा व्हावा; यासाठी प्रथमच याठिकाणी गुढी उभारून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
गुढीपाडवा या सणाच्या दिवशीही शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून सफाई कामगारांनी कामावर गैरहजर न राहता शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छता मोहीम राबवली. शहर हे प्रत्येकाचे घर आहे असे समजून प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी सफाई कामगारांनी नागरिकांना केले. घनकचरा प्रकल्प येथे सफाई कामगार व सर्वसामान्य नागरिकांबरोबर हा उत्सव साजरा करताना वेगळाच आनंद पाहायला मिळाला असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. राहाता नगरपालिकेच्यावतीने प्रथमच हा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल सर्वत्र मुख्याधिकारी चव्हाण व त्यांच्या कर्मचार्यांचे कौतुक होत आहे.