बोटा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; बोकडासह शेळी केली ठार वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे; नागरिकांची मागणी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा येथे बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शनिवारी (ता.2) पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास थेट सपरात घुसून बोकड व शेळीवर हल्ला करत ठार केले. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी सुमन दिनकर उकिर्डे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बिबट्याने त्यांच्या मोठ्या प्रमाणात कोंबड्याही फस्त केल्या आहेत.

बोटा शिवारातील जुनी बाजार गल्ली गणपती मंदिराच्या पाठीमागे सुमन उकिर्डे यांची वस्ती आहे. त्यांच्या वस्तीशेजारीच सपार असून त्यांनी सपरात बोकड व शेळीला बांधले होते. शनिवारी पहाटे बिबट्याने सपरात घुसून बोकड व शेळीवर हल्ला करत ठार केले. सकाळी या घटनेची माहिती समजताच वनरक्षक दिलीप उचाळे व बाळासाहेब वैराळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने उकिर्डे यांच्या मोठ्या प्रमाणात कोंबड्याही फस्त केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी सुमन उकिर्डे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. याचबरोबर सध्या कडक उन्हाळा असल्याने जंगली प्राणी पाणी व भक्ष्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे कूच करत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहावे, असे आवाहनही वन विभागाने केले आहे.

Visits: 209 Today: 2 Total: 2122228

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *