अकोल्यात राष्ट्रवादी – शिवसेनेची आघाडी तर काँग्रेस बाहेर! नगरपंचायत रणसंग्राम; भाजपचे दोन प्रभागांत उमेदवारच नाही..

ज्ञानेश्वर गायकर, ब्राह्मणवाडा
सोमवारचा (ता.13) दिवस हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस असताना अकोल्यात नाट्यमय राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडल्याने काहीवेळ मोठा तणाव निर्माण झाला होता. भाजपच्या महिला उमेदवाराने प्रभाग एकमधून माघार घेतल्याने व सातमध्ये उमेदवारी नसल्याने भाजप 11 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांची भक्कम आघाडी झाली असली तरी तीन ठिकाणी त्यांचे उमेदवार एकमेकांसमोर आल्याने तिथेही गोंधळ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी दहा, तर सेना तीन ठिकाणी निवडणूक लढवत असून काँग्रेस पक्षाने सहा ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत.

अत्यंत चुरशीच्या होणार्‍या अकोले नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी प्रभाग एकमधील महिला उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने काहीवेळ अकोल्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्हिडिओ चित्रीकरण दाखवल्याने हा मुद्दा गौण ठरला व स्वतः उमेदवाराने माघार घेतल्याने हा तणाव कमी झाला. भाजपचे दोन प्रभागात उमेदवारच नसल्याने त्यांना हा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला आहे. प्रभाग सातमध्ये भाजप अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता असून, एकमध्ये भाजप काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे समजते. यामध्ये काँग्रेस पक्ष सोमवारी पुन्हा तणावात दिसून आला. मधुकर नवले, मीनानाथ पांडे हे काँग्रेसचे दिग्गज अखेरपर्यंत महाविकासआघाडी करण्याचे आवाहन करत होते. मात्र आमदार डॉ. किरण लहामटे यांनी तडजोड न केल्याने आम्ही एकला चलो रे मार्ग निवडला असे पांडे व नवले यांनी सांगितले.

आमदार लहामटे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला असून, काँग्रेसची अवास्तव मागणी मान्य न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले. मनसे देखील तीन ठिकाणी निवडणूक लढवत असून उर्वरित ठिकाणी काही अपक्ष यांना पाठिंबा देऊ असे, हेमंत दराडे यांनी सांगितले. यावरुन अकोले नगरपंचायतसाठी काही लढती लक्षवेधी होणार असून भाजपचे सोनाली नायकवाडी तर सेनेचे गणेश कानवडे अशी सरळ लढत आहे. काही दिवसांपूर्वी वैयक्तिक टोकाला गेलेला वाद हा राजकीय आखाड्यात उतरला असून, याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कानवडे यांच्या बरोबर असल्याने ते चांगली आघाडी घेतली असे अकोले सेनाध्यक्ष नितीन नाईकवाडी यांनी सांगितले. तर माझा विजय माझ्या विकास कामांवर असल्याचे सोनाली नाईकवाडी यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आमदार डॉ. किरण लहामटे व जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर हे करत असून, गायकर यांचे मोठ वर्चस्व शहरात असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अकोल्यात मोठी सभा होणार आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची ही जमेची बाजू ठरणार आहे. तर कैलास वाकचौरे व माजी आमदार वैभव पिचड हे भाजपचे दिग्गज नेते रात्रंदिवस कष्ट घेत असून, अकोल्यातील पुरोगामी विचारांची जनता त्यांना पुन्हा स्वीकारणार का?, हे पाहणेही एक उत्सुकता आहे. काँग्रेस पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जात असला तरी प्रभाग एकमधून भाजपने काँग्रेस उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला तरच यावर शिक्कामोर्तब होईल. पण आज तसे चित्र नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे या निवडणुकीत अकोले काँग्रेसला किती मदत करतात हेही पाहावे लागेल. मंगळवारी (ता.14) भाजपचा प्रचार नारळ फुटला जाणार असून, काँग्रेसने प्रदीप नायकवडी यांच्या मतदारसंघात फोडला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांची अकोल्यात होणारी सभा बरेच काही सांगून जाणार असल्याने व गायकर यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला सत्ता मिळवून देण्यास नक्कीच यशस्वी होईल असे तरी चित्र आहे. 21 ला मतदान असून 22 तारखेला कोण किती पाण्यात असले हे स्पष्ट होणार होईल.

Visits: 14 Today: 1 Total: 113979

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *