एकविसाव्या शतकातील आव्हाने व बदल सर्वांनी स्वीकारावे ः डॉ.मंगरुळे संगमनेरातील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात ‘अर्घ्य’ प्रकाशन सोहळा संपन्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकविसाव्या शतकातील आव्हाने व बदल सर्वांनी स्वीकारले पाहिजे, तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाची क्रांती महत्त्वाची असते, या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपले ज्ञान वाढविले पाहिजे; कारण ज्ञान ही एक शक्ती आहे, ज्ञानाच्या जोरावर अनेक लोक यशस्वी झाले आहेत. त्यासाठी वाचन व लेखन केले पाहिजे. आपल्या अर्घ्य वार्षिक अंकामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख अतिशय वाचनीय आहेत, असे मत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्घ्य अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव डॉ.अनिल राठी, प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ, अर्घ्यच्या संपादिका प्रा.सारिका शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मालपाणी मनोगतात म्हणाले, जो आपले कर्म कौशल्याने करतो तोच खरा कर्मयोगी असतो. त्यासाठी प्रत्येकाने आपले कार्य कौशल्याने करण्यासाठी योग केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पहिले लिहायला शिकले पाहिजे, नंतर वाचायला आणि नंतर सांगायला शिकले पाहिजे. तेव्हा ज्ञान परिपूर्ण मिळते. महाविद्यालयाच्या अर्घ्य अंकामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्वरचित साहित्य लिहिले आहे. त्यांना मार्गदर्शन करणार्या संपादक मंडळाचे अभिनंदन. प्राचार्य डॉ.गायकवाड म्हणाले, अर्घ्यसाठी परिश्रम घेणार्या संपादक मंडळाचे व त्यासाठी योगदान देणार्या सर्वांचे अभिनंदन. वार्षिक अंकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले लेखन मांडण्यासाठी वेगळे व्यासपीठ मिळाले आहे. त्याचा विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात फायदा होईल असे मत व्यक्त केले.
उपप्राचार्य डॉ.ढमक म्हणाले, महाविद्यालयाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी आपला वार्षिक अंक हे एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. व्यवस्थापन मंडळाच्या प्रेरणेतून हा अर्घ्य अंक प्रकाशित होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना हक्काचे लिखाण करण्याचे एक व्यासपीठ मिळते. याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांनी घ्यावा. प्रास्ताविक अर्घ्यच्या संपादिका प्रा.सारिका शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शरद सावंत तर आभार पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.