महसूल वसुलीत संगमनेर उपविभाग ठरला जिल्ह्यात अव्वलस्थानी! निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक वसुली; 24 कोटी 52 लाखांचा महसूल झाला जमा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जमीन व गौण खनिज महसूल यातून मार्च अखेर संगमनेर महसूल विभागासाठी शंभर टक्के महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. संगमनेर उप विभागाने प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महसूली वसुलीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तर संगमनेर तालुक्याने कर्जत नंतर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. संगमनेर तालुक्यातील महसूल यंत्रणेने अपार परिश्रम घेत मार्चअखेर 24 कोटी 52 लाख 24 हजार रुपयांची वसूली केली आहे. तालुक्याने महसूल उद्दिष्टांपेक्षा अधिक म्हणजे 126.80 टक्के वसुली करीत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

महसूल विभागाच्या अंतर्गत जमीन महसूल, अनधिकृत अकृषक कर नजराणा प्रकरणे, मोबाईल टॉवर व इतर कर तसेच, गौण खनिज परवाने, शासकीय यंत्रणा स्वामित्व धन, अनधिकृत गौण खनिज या माध्यमातून संगमनेर महसूलसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शंभर टक्के जमीन महसूलीचे उद्दिष्टे देण्यात आले होते. यात जमीन महसूलापोटी 10 कोटी 12 लाख 83 हजार तर, गौण खनिजाच्या वसुलीपोटी पोटी 14 कोटी 39 लाख 41 हजारांचा महसूल जमा झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व प्रांतधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांचे वस्तुनिष्ठ नियोजन व मार्गदर्शन यामुळे हा जमीन महसूल जमा करण्यास संगमनेर तहसील विभागाला यश आल्याची प्रतिक्रीया यावेळी तहसीलदार निकम यांनी दिली.

कोविड परिस्थिती असूनही जमीन महसूल, नजराणा प्रकरणं, मोजणी, कुळ कायदा प्रकरणं, बिनशेती, शर्तभग, अनाधिकृत एनए, तुकडा नियमाकुल, शासकीय कामे रॉयल्टी, गौण खनिज दंड, वाहतूक कारवाई या माध्यमातून 24 कोटी 52 लाख 24 हजार रूपयांची वसुली करतांना 126.80 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, तालुक्यातील सर्व कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून तालुका महसूलाच्या बाबतीत जिल्ह्यात दुसर्‍यास्थानी आल्याने प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे व तहसीलदार निकम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.

Visits: 60 Today: 1 Total: 116767

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *