खचलेल्या पुलासाठी रहिवाशांसह विद्यार्थ्यांचाही आक्रोश! पालिकेवर धडक मोर्चा; मंजुरी अंतिम टप्प्यात असल्याची मुख्याधिकार्यांची ग्वाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बांधकाम विभागातील तत्कालीन शहर अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे आडहत्यारी ठेकेदाराने पायाच पोखरुन काढल्याने म्हाळुंगी नदीवरील पूल एकाबाजूने खचला. या घटनेला आता वर्ष उलटत असतानाही त्याच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याने साईनगर, पंम्पिग स्टेशनसह परिसरात राहणार्या हजारो नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या नागरीक व विद्यार्थ्यांनी आज पालिकेवर धडक देत मुख्याधिकार्यांच्या दालनासमोरच ठिय्या दिला. यावेळी विद्यार्थ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने पालिकेचे कार्यालय दणाणून गेले होते. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आंदोलकांना सामोरे जात आजवरचा घटनाक्रम आणि पुलाच्या कामाबाबतची सद्यस्थिती सांगत आवश्यक असलेला ५ कोटी ७६ लाखांचा निधीही प्राप्त झाल्याची माहिती दिली. अधीक्षक अभियंता आणि जिल्हाधिकार्यांच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविल्याचे व लवकरच त्याला मंजुरी मिळण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. याबाबत आंदोलकांनी लेखी देण्याची मागणी केल्यानंतर सायंकाळपर्यंत त्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी रंगारगल्लीतून प्रवरा परिसराकडे जाणार्या रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवर बांधलेला पूल स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने खचला होता. त्यामुळे साईनगर, पंम्पिग स्टेशन, हिरेमळा, घोडेकरमळा, कासारवाडी या भागात राहणार्या हजारों नागरीकांसह सराफ विद्यालय व ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होवू लागले. त्याला पर्याय म्हणून पालिकेने तातडीने वाहून गेलेल्या कच्च्या पुलाची दुरुस्ती करीत किरकोळ वाहतुकीसाठी तो पूल सुरु केला. मात्र त्यावरुन जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत असल्याने आणि त्यातच गेल्या आठवड्यात म्हाळुंगी नदीला आलेल्या पाण्याने ‘त्या’ पुलाचे अस्तित्वही धोक्यात आल्याने मुख्य पुलाच्या बांधकामासाठी परिसरातील रहिवाशी व विद्यार्थी संतप्त झाले.
या सर्वांनी आज सकाळी मोर्चाने पालिकेत येवून जोरदार घोषणा केली. यावेळी आंदोलकांसमोर उपस्थित झालेल्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. या निवेदनातून पुलाबाबत आजपर्यंतचा घटनाक्रम, मिळालेली आश्वासने, मोठी लोकसंख्या व विद्यार्थ्यांना दररोज होणारा त्रास या गोष्टींचा उल्लेख करीत लवकरात लवकर या पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु न झाल्यास १३ ऑक्टोबर रोजी खचलेल्या पुलाचे श्राद्ध पालिकेच्या आवारात घालण्यासह नदीकाठावर पार पडणारे सगळे दहावे व अन्य विधी पालिकेच्या आवारातच करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मोर्चात महिला, मुले, विद्यार्थी, तरुण व वृद्ध अशा सर्वच पातळीवरील नागरिकांचा समावेश होता.
यावेळी मुख्याधिकार्यांच्या दालनासमोरच आंदोलकांनी ठिय्या दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत पालिकेचे कार्यालय दणाणून सोडले. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आंदोलकांसमोर येत गेल्या वर्षभरात झालेल्या कारवाईचा अहवालच सादर केला. यावेळी बोलताना त्यांनी १९९९ साली सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय नियमाने त्याची दुरुस्ती अथवा नूतनीकरण होवू शकत नसल्याचे सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे व अखेर पालिकेनेच नाशिकच्या एका संस्थेकडून ऑडिट करुन घेतल्याचे आंदोलकांच्या निदर्शनास आणून दिले. सुरुवातीला जितका भाग खचला आहे, तितक्याच भागाचे नूतनीकरण करुन वेळ आणि खर्च वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचे मात्र स्ट्रक्चरल ऑडिटमधून तसे करणे अशक्य असल्याची बाब समोर आल्याची माहितीही त्यांनी दिली.
गेल्या वर्षी पूल खचला त्यावेळी त्याच्या नूतनीकरणासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, मात्र आता त्याचे अंदाजपत्रक बदलले असून या पुलासाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांची आवश्यकता असून तेवढा निधी पालिकेच्या तिजोरीत जमा असल्याचेही मुख्याधिकार्यांनी सांगितले. नाशिकच्याच संस्थेकडून सदरील पुलाचा आराखडा तयार करण्यात आला असून तो संगमनेर, नगर, नाशिक व मुंबई येथील कार्यालयांना मंजुरीसाठी पाठविल्याचे व नाशिक आणि मुंबई कार्यालयांची मंजुरी मिळाल्याचे ते म्हणाले. सदरील पूल दीर्घकाळ टिकेल यासाठी त्याचे कामही मजबुतपणे करणार असल्याचे व अहमदनगरच्या अधीक्षक अभियंत्यांच्या मंजुरीनंतर जिल्हाधिकार्यांच्या अंतिम तांत्रिक मंजुरीने लवकरच या पुलाचे काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन देतांना मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी यासाठी कामात सर्वच लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाल्याचे सांगत अंतिम टप्प्यात असलेल्या प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याची विनंती आंदोलकांना केली.
त्यावर त्यांनी सांगितलेली माहिती लेखी स्वरुपात देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. ती मान्य करीत आज सायंकाळपर्यंत लेखी देण्याची बाबही त्यांनी मान्य केली. त्यानंतर आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जावून कार्यकारी अभियंत्यांनाही निवेदनाची प्रत देवून लवकरात लवकर त्यांच्याकडील अहवाल व मंजुर्या पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली. त्यांनीही आंदोलकांना सकारात्मक आश्वासन दिल्याने येत्या महिनाभरात गेल्या वर्षभरापासून लंगड्या अवस्थेत उभ्या असलेल्या म्हाळुंगी नदीच्या पुलाचे काम सुरु होण्याच्या आशा जागल्या आहेत.
आंदोलनासाठी लोकवर्गणी..
या पुलाचा वापर करणार्यांमध्ये बहुतेक सर्वजण सामान्य कुटुंबातील नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आंदोलन उभारताना त्याच्या प्रसिद्धीसाठी व अन्य कारणांसाठी लागणार्या निधीची कमतरता होती. त्यासाठी परिसरातील तरुणांनी समाज माध्यमात समूह निर्माण करुन आंदोलनासाठी किमान २१ रुपयांचा निधी देण्याचे आवाहन केले. त्याला नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला असून अवघ्या चोवीस तासांतच आवश्यक निधी जमा झाला आहे. त्यातून पुलाच्या मागणीसाठी येथील सामान्य नागरिकांची झालेली एकजूट वाखाणण्यासारखी आहे.