पठारभागातील जमिनीच्या भेगांची अधिकार्‍यांकडून पाहणी नगरच्या वरीष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम करणार अहवाल सादर

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोरबन गावांतर्गत असलेल्या सराटी (टेकडवाडी) येथील काही घरांच्या शेजारील रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी भेगा पडल्या होत्या. यामुळे नागरिकिंची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर शनिवारी (ता.1) सकाळी अहमदनगर येथील वरीष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी रश्मी कदम यांनी भेट देत पडलेल्या भेगांची पाहणी केली. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी काळदरा येथील खडकांनाही पडलेल्या भेगांची पाहणी केली. याबाबत लवकरच आहवाल सादर करण्यात येईल. मात्र नागरिकांनी घाबरून जावू नये असे आवाहन त्यांनी केले.

बुधवारी (ता.30) सकाळी सराटी (टेकडवाडी) वस्तीवरील काही घरांच्या शेजारील रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी भेगा पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. यामुळे काहीवेळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. याबाबत सरपंच संदेश गाडेकर यांनी तत्काळ महसूल विभागाला कळविले होते. त्यानंतर कामगार तलाठी यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली होती. याबाबत तहसीलदार अमोल निकम यांनीही वरीष्ठ भूवैज्ञानिक अधिकार्‍यांना यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी वरीष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी रश्मी कदम यांनी बोरबनच्या टेकडवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पडलेल्या भेगांची पाहणी केली व सरपंच संदेश गाडेकर यांच्यासह नागरिकांबरोबर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बोरबन परिसरातीलच डोंगरदर्‍यात असलेल्या काळदरा येथील दोन वर्षांपूर्वी खडकावर पडलेल्या भेगांचीही पाहणी केली.

अशा पद्धतीने पडलेल्या भेगांची बरीच कारणे असू शकतात. सध्या आपण पाहणी केली आहे. परंतु, लगेच काही सांगणे कठीण आहे. यापूर्वीचा मेरी संस्थेचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातून घेणार आहे. सध्या तरी या भेगांवर लक्ष ठेवून राहा आणि घाबरून जावू नका. काही आवाज येतोय का यावरही बारीक लक्ष ठेवा आणि काही वाटल्यास तत्काळ आम्हांला कळवा. वेळप्रसंगी मेरी संस्थेच्या अधिकार्‍यांची देखील मदत घेवू असे कदम म्हणाल्या. यावेळी सरपंच संदेश गाडेकर, आनंथा गाडेकर, नवनाथ गाडेकर, देवीदास गाडेकर, बंडू गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, विलास गाडेकर, कोतवाल शशीकांत खोंड यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Visits: 14 Today: 1 Total: 118388

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *