शिर्डीत वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद सर्वत्र शुकशुकाट; तर पोलिसांकडून कसून तपासणी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
महाराष्ट्र शासनाने शनिवार, रविवार या दोन दिवशी वीकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. शिर्डीमध्ये रविवारी (ता.11) वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घराबाहेर न जाता घरी राहणे पसंत केल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.

कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्याने राज्य शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 5 एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, हॉटेलमध्ये पार्सल सुविधांची, बेकरी पदार्थ विक्रीस परवानगी देत अन्य सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आणि शनिवार व रविवार वीकेंड लॉकडाऊनचे आदेश दिले. त्यानुसार कडक निर्बंध लादत मिनी लॉकडाऊन सुरु झाला आहे. पहिल्या शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊनला शिर्डीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळी मेडिकल व दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. सर्व दुकाने बंद असल्याने नागरीकांनी देखील घराबाहेर पडणे टाळत वीकेंड लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद दिला. वीकेंड लॉकडाऊन पाळल्याने सर्व रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे सर्व शुकशुकाट जाणवत होता.

शिर्डी नगरपंचायत व पोलीस ठाण्याचे पथक कोठे दुकाने चालू आहे का, विनाकारण नागरिक फिरत आहे का याची शहरात देखरेख करत होते. नियमांचे पालन न करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी शहरात ठिकठिकाणी भेटी देत पाहणी केली. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले की, शिर्डी शहरात वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नगरपंचायतच्या पथकाने शहरात जाऊन पाहणी केली. ज्या भागात अधिक रुग्ण आहेत. त्याठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करुन संपर्कात आलेल्या नागरिकांची थर्मामीटर गणच्या सहाय्याने तपासणी केली जात आहे. पूर्वी तीस रुग्ण मिळून येत होते. दोन दिवसांपासून रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. दिवसाला दहा रुग्ण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपंचायतचे पथक जनजागृती व तपासणी मोहीम चांगल्या पद्धतीने राबवत आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असे आवाहनही डोईफोडे यांनी केले आहे.
