पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ठरतोय बिबट्यांसाठी ‘मृत्यूघंटा’! वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी कधी उपाययोजना होणार; वन्यप्रेमींचा सवाल

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग बिबट्यांसाठी मृत्यूघंटा ठरत आहे. रविवारी (ता.27) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आळेखिंड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादीचा मृत्यू झाला आहे. तर यापूर्वी महामार्गावर गेल्या वर्षभरात तब्बल दीड डझनहून अधिक बिबट्यांचे वाहनांच्या धडकेत मृत्यू झाले आहेत. तरी देखील वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्यापपर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. यामुळे महामार्गावर अजून किती बिबट्यांचा ‘बळी’ घेणार असा संतप्त सवाल वन्यप्रेमी करत आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील आळेखिंड येथे रविवारी रात्री भक्ष्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना बिबट मादीला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. यामध्ये गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना महामार्गावरून जाणार्या वाहनचालकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ कुर्हाडे वस्ती जवळील काही नागरिकांना माहिती दिली. त्यांनी पोलीस पाटील संजय जठार यांना सांगितली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकार्यांना समजताच वनरक्षक दिलीप उचाळे, वनसेवक बाळासाहेब वैराळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत बिबट मादीस महामार्गावरून बाजूला घेतले. त्यानंतर संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत आणून सोमवारी (ता.28) शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांनी दिली.
![]()
सध्या कडक उन्हाळा सुरू असून, पाणी व भक्ष्याच्या शोधात बिबट्यांसह जंगली श्वापदे संचार करत असतात. पठारभागात वनसंपदा अधिक असल्याने महामार्गावरुन ही श्वापदे कायमच ये-जा करत असतात. यामुळे रात्रीच्या वेळेत भरधाव वेगातील वाहनांची धडक बसल्याने मुक्या जीवांचा बळी जात आहे. यापूर्वी जंगली श्वापदांना जुन्या महामार्गावर एकेरी वाहतूक असल्याने लवकर महामार्ग ओलांडता येणे शक्य होते. मात्र, आता महामार्गाचे नव्याने काम झाल्याने दुहेरी वाहतूक होत असल्याने त्यातच वाहनांचा वेगही कमालीचा राहत असून, श्वापदांना अंदाज येत नसल्याने वाहनांच्या धडकेत बळी जात आहे. गेल्या वर्षभरात तब्बल दीड डझनहून अधिक बिबट्यांसह इतर जंगली प्राण्यांचा बळी गेला आहे.

जंगली श्वापदांचे बळी रोखण्यासाठी वन विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांच्या पथकाने महामार्गावरील अपघात स्थळे शोधली. यावर उपाययोजनाच्या करण्याच्या दृष्टीने महामार्गाच्या खालून भूयारी मार्ग तयार करण्याबाबत पाहणी केली. परंतु, अद्यापही यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने अधिकार्यांची ही केवळ ‘सहल’च ठरली आहे.

बिबट्यांसह जंगली प्राण्यांचे महामार्गावरील मृत्यू रोखण्यासाठी आम्ही वन विभागाच्या संबंधित अधिकार्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. याशिवाय आमच्या पातळीवरही आम्ही उपाययोजना करत आहोत.
– संदीप पाटील (उपविभागीय वनाधिकारी, संगमनेर)
