जंगली रानमेवा ‘आंबळं’ ठरतोय आदिवासींसाठी रोजगार! भंडारदरा, राजूर, घोटीसह ग्रामीण भागात करताहेत विक्री
नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील निसर्गसंपन्न भंडारदर्याच्या बाजारपेठेत जंगली रानमेव्याचे आगमन झाले असून हा जंगली रानमेवा आदिवासी बांधवांसाठी पोटाची खळगी भरणारा ठरत आहे.
अकोले तालुक्याच्या पश्चिमेला भलीमोठी सह्याद्रीची रांग पसरलेली असून या रांगेच्या कड्या कपारीला ‘आंबळं’ नावाचे जंगली रानफळ भरभरुन पिकत आहेत. ही आंबळं चवीने आंबट-गोड असून घाटघरच्या हिवाळा नाला, रतनवाडीचा रतनगड, शिंगणवाडीचा मोटाचा डोंगर तर सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असणार्या कळसूबाईच्या डोंगरावर आंबळांची झाडे मोठ्या प्रमाणात पिकलेली दिसून येत आहेत. साधारणतः शिमगा सणाच्या आसपास हे फळ पिकण्यास सुरुवात होते. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील आदिवासी बांधव ही फळे तोडण्यासाठी भल्या पहाटेच जंगलाचा रस्ता धरतात. सकाळी आठ वाजेच्या आत आंबळांची भरलेली पाटी घेऊन भंडारदर्याच्या बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी हे बांधव आता गर्दी करु लागले आहेत. दहा रुपयांपासून या आंबळांची विक्री सुरू होते.
भंडारदर्याच्या बाजारेपेठेबरोबर ही आदिवासी बांधवं आंबळांच्या पाट्या घेऊन घोटी, राजूर यांसारख्या मोठ्या बाजारपेठेतही मिळेल त्या साधनाने विक्री करण्यासाठी जाऊ लागली आहेत. तर काही आदिवासी बांधव विक्रीसाठी आजूबाजूच्या खेड्यांतही जात आहेत. आंबळं विक्री करणार्या हौसाबाई पोकळे व उल्हाबाई गांगड यांना आंबळं या जंगली रानमेव्याविषयी विचारले असता आमची लोकं ही पावसाळ्यात कालवणाची सोय व्हावी या उद्देशाने पैशांबरोबरच कडधान्य, वाल, हरभरा, मसूर यांच्या दाळीच्या बदल्यात आंबळं विकत असल्याचे सांगितले. या आंबळांमुळे आमच्या वाट्याला दोन पैसे मिळत असून आम्हांला ही जंगली फळे रोजगाराचे एक साधन असल्याचे सांगतात. साधरणतः आंबळांचा काळ एक महिना असतो. ही आंबळं संपत नाही तेच डोंगरची काळी मैनाही बाजारात दाखल होण्याच्या तयारीत असते.