मद्यधुंद आरोग्य अधिकार्याची दुचाकीला धडक! कोकणगावजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिर्डीच्या दिशेने जाणार्या सर्वच रस्त्यांवर भाविकांची गर्दी दाटलेली असताना तालुक्याच्या विविध भागातून तब्बल पाच जणांच्या मृत्यूच्या बातम्याही समोर आल्या आहेत. त्यातील एका घटनेत कोकणगाव शिवारात कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून त्यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात कार्यरत असलेला एक आरोग्य अधिकारी मद्याच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत चालवत असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. याबाबत तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर अपघातात आपले नाव समोर येवू नये यासाठी संबंधित आरोग्य अधिकार्याकडून दबावतंत्राचा वापर सुरु असल्याचेही समजते. एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या या अधिकार्याच्या रक्ताचे नमुने तपासण्याचीही गरज यातून निर्माण झाली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा भीषण अपघात रविवारी (ता.2) रात्री साडेदहाच्या सुमारास संगमनेर-लोणी रस्त्यावरील वडगावपान टोल नाक्याच्या पुढे काही अंतरावर घडला. या अपघातात लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येणार्या एका कारची समोरुन येणार्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. धडकेच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात दुचाकीचे पूर्णतः नुकसान होण्यासह त्यावरील दोघांनाही जीवघेणा मार लागला. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनाची धडक बसल्यानंतर कारची एअरबॅग उघडली गेल्याने सदरचे वाहन चालविणारा मद्यधुंद आरोग्य अधिकारी मात्र बालंबाल बचावला.

मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी सदर अपघाताबाबत तालुका पोलिसांसह 108 क्रमांकालाही माहिती दिल्याने काही वेळातच दाखल झालेल्या रुग्णवाहिकेतून सुरुवातीला दोघांनाही संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने आणि त्यातच अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दुचाकीवरील अमोल गजानन सानप (वय 30, रा.कर्हे, ता.संगमनेर) या तरुणाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही क्षणातच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला शुभम विलास ठाणेकर (वय 19) हा तरुण देखील गंभीर जखमी झाल्याने संगमनेरात त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही मिळाली आहे.

या अपघातानंतर एकाच्या मृत्यूस आणि दुसर्याला जीवघेणी दुखापत करण्यास कारणीभूत ठरलेला वाहनाचा चालक आणि तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रात गेल्या चार वर्षांपासून ठाण मांडून बसलेला आरोग्य अधिकारीही मुका मार लागल्याच्या कारणावरुन शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या भीषण अपघातास कारणीभूत असलेला आरोग्य अधिकारी गुन्ह्यात आपले नाव येवू नये यासाठी दबावतंत्राचा वापर करीत असून पोलिसांनी मानवता आणि कायद्याला प्राधान्य देवून त्याची रक्तचाचणी करुन त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक श्रीनिवास वमने व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यावर काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आणखी एका तरुणाचा बळी!
एकीकडे कोकणगाव शिवारातील या भीषण अपघाताची वार्ता समोर येत असताना त्याचवेळी शिर्डीच्या दिशेने जाणार्या निळवंडे शिवारातूनही वेदनादायी वृत्त समोर आले असून दुचाकी आणि पिकअपच्या अपघातात संगमनेरातील देवीगल्लीत राहणारा अनुकूल सत्यवान मेंढे (वय 21) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदरील टेम्पोच्या चालकांनी मयताचे वाद झाले होते, त्यानंतर काही वेळातच हा अपघात घडल्याची चर्चाही कानावर आली असून हा अपघात आहे की घात यांचा तपास होण्याची गरज आहे. या घटनेने संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात असून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या तीन, आत्महत्येच्या दोन आणि बुडीताच्या एका घटनेत एकाच दिवशी तालुक्यात पाचजणांचा बळी गेला आहे.

