अखेर भारत चौकातील ‘ती’ बावीस अतिक्रमणे हटविली! न्यायालयीन आदेशाचे पालन; पालिकेकडून फौजफाट्यासह झाली कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीन वर्षांपूर्वी पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण हटाओ मोहिमेला विरोध करीत न्यायालयात दाद मागणार्‍या भारत चौकातील 22 अतिक्रमण धारकांचे मनसुबे अखेर उधळले गेले आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अतिक्रमण धारकांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत 25 मार्चपर्यंत भारतचौक अतिक्रमण मुक्त करुन त्याचे संपूर्ण छायाचित्रण सादर करण्याचे आदेश संगमनेर नगरपालिकेला दिले होते. त्यानुसार आज सकाळीच पालिकेने फौजफाट्यासह जात हा संपूर्ण परिसर अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त केला आहे. या कारवाईनंतर आसपासच्या रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून पुन्हा येथे अतिक्रमणे होणार नाहीत यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे.

सन 2018-19 मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी प्राजीत नायर यांची संगमनेर नगरपरिषदेच्या परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून तीन महिन्यांसाठी नियुक्ति करण्यात आली होती. या कालावधीत त्यांनी शहराच्या विविध भागात पालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर अतिक्रमणे करुन इमले व व्यवसाय थाटणार्‍यांवर कारवाई करतांना शहर अतिक्रमण मुक्त केले होते. मात्र पालिकेच्या कारवाईचा पंजा भारत चौकातील अतिक्रमणांवर पडण्यापूर्वीच तेथील 22 अतिक्रमण धारकांनी त्याला विरोध करीत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण हटाओ मोहिमेला भारत चौकात खीळ बसली.

याबाबत याचिकाकर्ते अतिक्रमणधारक व पालिका यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली व भारतचौकातील सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले. मात्र याचिकाकर्त्यांना वरीष्ठ न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी ठराविक कालावधीही दिला होता. त्यादरम्यान संबंधित याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करीत दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून भारतचौकातील अतिक्रमणाचा विषय अधांतरीत होता. चालू महिन्यात सदरची याचिका उच्च न्यायालयाच्या पटलावर आली. यावेळी सदर याचिकेवर कोणत्याही प्रकारची सुनावणी घेण्यास नकार देत उच्च न्यायालयाने संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यासोबतच 25 मार्चपर्यंत संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी भारत चौकातील सर्व अतिक्रमणे हटवून त्याचे चित्रण करावे व सदरील चौक अतिक्रमण मुक्त झाल्याबाबतचा सविस्तर अहवाल संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सादर करण्याचेही आदेश बजावले होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज (ता.28) पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळीच जय्यत तयारी करताना दोन जेसीबी यंत्र, तीन ट्रॅक्टर व शंभरावर कर्मचारी व मुबलक पोलीस बंदोबस्तासह भारतचौकात कारवाई केली. यावेळी ‘त्या’ 22 अतिक्रमण धारकांसह या परिसरात नव्याने उभ्या राहीलेल्या टपर्‍याही पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त करीत त्याचा संपूर्ण राडारोडा जप्त केला. सदरची कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने होत असल्याने कोणत्याही अतिक्रमण धारकाने त्याला विरोध करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरु झालेली कारवाई अवघ्या दोन तासांत पूर्ण करण्यात आली. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी या संपूर्ण कारवाईचे छायाचित्रण करुन त्याबाबतचा अहवाल संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठात सादर केला असून न्यायालयीन आदेशाचे तंतोतंत पालन केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या कारवाईनंतर भारत चौकाचे विस्तृत दर्शन घडू लागले असून येथील अतिक्रमणात गुडूप झालेल्या रहिवाशांनी आज आम्ही मोकळा श्वास घेत असल्याची प्रतिक्रीया देतांनाच या भागात पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी पालिकेने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

भारत चौक अर्थात शाळा नंबर एकचा परिसर अतिशय विस्तीर्ण असा आहे. मात्र गेल्या काही वर्षात या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून येथील बहुतेक अतिक्रमित टपर्‍यांमध्ये बेकायदा उद्योग सुरु असल्याच्याही असंख्य तक्रारी होत्या. पालिकेकडून या भागातील अतिक्रमणे हटविली गेल्याने आता येथील अवैध व्यवसायही धुळीस मिळाले असून ते पुन्हा उभे राहू नयेत अशी येथील रहिवाशांना अपेक्षा आहे. भारत चौकात कारवाई सुरू असताना त्याच्या चर्चा गावभर पसरल्याने शहरातील अन्य भागातील अनेक अतिक्रमणधारक व फेरीविक्रेते आज गायब झाल्याने बहुतेक शहरही आज मोकळे वाटत होते.

Visits: 116 Today: 1 Total: 1112084

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *