ऐन उन्हाळ्यात मुळा खोर्‍यातील पाणीप्रश्न पेटला! ब्राह्मणवाड्याच्या संतप्त ग्रामस्थांनी ठोकले महावितरणला टाळे..

नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या वीजबिल वसुली मोहीम जोरात सुरू आहे. अनेक थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. याचाच प्रत्यय अकोले तालुक्याच्या मुळा खोर्‍यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरण कंपनीने ब्राह्मणवाडा गावच्या पाणी पुरवठा योजनेची वीज तोडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.25) ग्रामस्थांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक देत टाळे ठोकले. यामुळे अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ उडाली.

दोन दिवसांपूर्वी महावितरण कंपनीने ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा येथील पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी तोडली. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न ऐरणीवर आला. त्यातच महावितरणकडून थकीत वीजबिल वसुली मोहीम जोरात सुरू आहे. यामुळे अनेक पाणी पुरवठा योजनांसह घरगुती ग्राहकांचाही वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. परंतु, जीवनावश्यक बाब म्हणून पाणी पुरवठा योजनेबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असताना महावितरणने पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा दोन दिवसांपूर्वी खंडित केला.

पूर्वीपासून ब्राम्हणवाडा भागाचा पाणीप्रश्न हा गंभीर आहे. त्यात हा पठारी भाग असल्याने ऐन उन्हाळ्यात विहिरींना आणि बोअरवेलला पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त असतानाच पिण्याच्या पाण्याचा वीज पुरवठा बंद केल्याने ते अधिक संतप्त झाले. यातूनच शुक्रवारी ग्रामस्थांनी एकत्र येत थेट महावितरण कार्यालयावर धडक देत कार्यालयाला टाळे ठोकले. तसेच येत्या 9 तारखेला या प्रश्नी रास्ता रोको करण्याचाही इशारा दिला आहे.


महावितरण कंपनीला थकीत वीजबिलापोटी 1 कोटी 66 लाख 53 हजार 21 रुपये देणे आहे. याचबरोबर ग्रामपंचायतला देखील महावितरणकडून एकूण कराची 6 कोटी 28 लाख 93 हजार 249 रुपये थकबाकी येणे आहे. तरी ऐन उन्हाळ्यात महावितरणने पाणी पुरवठा योजनेची वीज खंडित करणे योग्य नाही.
– सुभाष गायकर (उपसरपंच-ब्राह्मणवाडा)

Visits: 7 Today: 1 Total: 115423

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *