मोमीन आखाडा येथे गवत काढण्याच्या कारणावरुन तिघांना मारहाण राहुरी पोलिसांत सात जणांवर गुन्हा दाखल; जखमींवर उपचार सुरू

नायक वृत्तसेवा, राहुरी
शेतातील गिन्नी गवत काढण्याच्या कारणावरुन सातजण लाकडी काठी, दांडा व स्टंप घेऊन घरात घुसले. त्यांनी सासू, सून व पतीला मारहाण केली. सदर घटना बुधवारी (ता.23) मोमीन आखाडा (ता.राहुरी) येथे घडली आहे. या प्रकरणी नुकताच पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी रात्री स्वाती सतीश गागरे व त्यांची सासू घरात होत्या. त्यावेळी अर्जुन सारंगधर कदम, सागर अर्जुन कदम, मनोज नानासाहेब कदम, नितीन नानासाहेब कदम, छाया अर्जुन कदम, शांताबाई नानासाहेब कदम, अर्जुन सारंगधर कदम यांची मुलगी हे सर्वजण लाकडी काठी, दांडा व स्टंप घेऊन गागरे यांच्या घरात घुसले. त्यानंतर त्यांना म्हणाले, तुम्ही आमचे गिन्नी गवत का तोडले? असे म्हणून शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात स्वाती गागरे यांचे पती सतीश अण्णासाहेब गागरे हे तेथे आले.

त्यावेळी वरील आरोपींनी तिघांना लाकडी काठी, दांडा व स्टंपसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरातील खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. त्याउपर तुम्ही आमच्या नादी लागले तर तुमचा एकाएकाचा कोयत्याने जीव घेऊ, अशी धमकी दिली. सध्या या घटनेत जखमी झालेल्यांवर राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी स्वाती सतीश गागरे यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपी अर्जुन सारंगधर कदम, सागर अर्जुन कदम, मनोज नानासाहेब कदम, नितीन नानासाहेब कदम, छाया अर्जुन कदम, शांताबाई नानासाहेब कदम, अर्जुन सारंगधर कदम यांची मुलगी अशा सात जणांवर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार हनुमंत आव्हाड हे करीत आहेत.
