सावधान; भंडारदरा धरणाच्या उन्हाळी आवर्तनाला सुरुवात! पहिले आवर्तन सुटले; नागरिक आणि पोलीस दोहींचीही जबाबदारी वाढली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपेक्षेप्रमाणे भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रासाठी पहिले उन्हाळी दीर्घ कालावधीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. एकीकडे तापमानाचा पारा चढत असतांना दुसरीकडे अमृतवाहिनी सुमारे महिनाभर वाहती राहणार असल्याने नदीकाठावरील गावांमध्ये उत्साहाला भरते आले आहे. या आवर्तनाचा उद्देश सिंचनासाठी आहे, मात्र दरवर्षीचे उन्हाळी आवर्तन संगमनेर व अकोले शहरवासियांसाठी पर्वणीचे ठरत असते. त्याच पर्वणीचा शंखनाद झालेला असताना संगमनेरकरांनी सावधानता बाळगण्याचीही गरजही निर्माण झाली आहे. प्रचंड वाळू उपशामुळे नदीपात्र अत्यंत धोकादायक बनल्याने यापूर्वीही उन्हाळी आवर्तनात वेदानादायक घटना घडल्या होत्या. त्या टाळण्यासाठी नागरीकांनी आणि या कालावधीत प्रवरेकाठी महिलांची होणारी गर्दी पाहता पोलिसांनी सावधान राहण्याची आवश्यकता आहे.

अकोले तालुक्यातून उगम पावणारी अमृतवाहिनी प्रवरा अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर व नेवासा अशा दोनशे किलोमीटरचा प्रवास करुन प्रवरासंगम येथे गोदावरीला जावून मिळते. मात्र संगमनेर तालुक्यातील ओझर येथे प्रवरानदीवर बंधारा घालून पात्रातील पाणी डाव्या व उजव्या अशा दोन कालव्यांद्वारा राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यांत सिंचनासाठी वापरले जाते. त्यामुळे पावसाळ्यातील ओव्हर फ्लो वगळता उर्वरीत कालावधीत ओझरपासून प्रवरासंगम पर्यंतचे नदीपात्र वर्षभर कोरडे असते. याचाच अर्थ उगमापासून संगमापर्यंत पाच तालुक्यांतून जाणार्या अमृतवाहिनीची एकूण लांबी दोनशे किलोमीटर असली तरीही भंडारदरा-निळवंडे धरणातून सुटलेल्या प्रत्येक आवर्तनातून नदी पर्यटनाचा लाभ केवळ संगमनेर-अकोले या दोनच तालुक्यांना मिळतो.

दहावी-बारावीसह इतरही परीक्षा संपण्याचा आणि धरणातून उन्हाळी आवर्तन सुटण्याचा कालावधी जवळपास एकच असल्याने आवर्तना दरम्यान संगमनेरचा प्रवरा परिसर अबालवृद्धांनी दाटलेला असतो. मोठा पौराणिक इतिहास असला तरीही संगमनेरात कुटुंबासाठी आनंद घेण्यासाठी आवश्यक असलेले एकही ठिकाण नाही. त्यामुळे मंदिरांच्या दाटीत पसरलेल्या प्रवराकाठावर जूनपर्यंतच्या उन्हाळी आवर्तनांमध्ये दररोज गर्दीचे उच्चांक होतात. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारे एका ठिकाणी जमा होण्यास मनाई असल्याने संगमनेरकरांना दोन वर्ष उन्हाळी आवर्तनांपासून दूर रहावे लागले आहे. त्यामुळे यावर्षी आवर्तनांच्या कालावधीत नदीपात्रालगत मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.

साईमंदिर ते गंगामाई घाट अशा विस्तीर्ण प्रवराकाठी फिरायला येणार्यांना अडथळा नको म्हणून पालिकेने साई मंदिराकडून गंगामाई मंदिराकडे जाणार्या रस्त्यांवर अडथळे निर्माण केले आहेत. त्यामुळे या कालावधीत जोर चढलेले टवाळखोर गंगामाई मंदिराच्या बाजूने दुचाक्या घेवून येतात व थेट महादेव घाटापर्यंत सुसाट वाहने चालवतात. त्यातून अपघाताची शक्यता कायम असते. त्यासोबतच सायंकाळच्या वेळी या भागात महिला व मुलींचाही मोठा वावर असल्याने मजनूंची संख्याही मोठी असते. त्यांच्याकडून वेगवेगळे माकडचाळे सुरू असल्याने त्यातून तणाव, भांडणे होण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडलेले आहेत. अलिकडे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी उन्हाळी आवर्तनाच्या कालावधीत नदीकाठावर नियमीत योग्य तो बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे.

प्रवरा नदीचे उन्हाळी आवर्तन म्हणजे संगमनेरकरांसाठी आनंद मेळाच ठरत असते. धरणं भरलेली असल्यास उन्हाळ्यात एकामागून एक मिळणारी तीन दीर्घ आवर्तने या मेळ्यामागील कारण असते. संगमनेरच्या प्रवराकाठाला तर या कालावधीत दररोज सायंकाळी जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. विविध प्रकारच्या खाद्यांन्नाची दुकाने, लहान मुलांसाठी खेळण्यांची व फुग्याची दुकाने, कुल्फी-आईस्क्रीम असे बरेच काही या भागात फेरीवाल्यांमार्फत मिळते. त्यामुळे संगमनेरकर कुटुंबकबील्यासह या ठिकाणी येतात. त्यातून कुटुंबातील लहान मुलांना आंघोळ करण्याची, कधीनवद पोहण्याची हौस होते, आणि येथेच अपघाताला निमंत्रण मिळते. आजवरच्या घटना वारंवार हेच सांगत आल्या आहेत.

गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे संगमनेरच्या प्रवरानदीचे पात्र अतिशय धोकादायक व अनियमित बनले आहे. वाळू तस्करांनी वाट्टेल तेथून वाळू ओरबाडून काढीत अमृतवाहिनीचे अक्षरशः लचके तोडले आहेत. त्यामुळे आधीच धोकादायक असलेले नदीपात्र आता अधिक भयानक झालेले आहे. अनियमित प्रवाहामुळे अचानक खड्डा किंवा पाण्याचा वेग अनुभवायला मिळू शकतो व त्यातूनच अपघाताची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे पोहता येणारे सोबत असतील आणि नदीपात्राची नेमकी माहिती असेल तरच पाण्यात उतरायला हवे, अन्यथा दुर्घटना प्रसंगाच्या प्रतीक्षेतच आहे.

संगमनेरकरांसाठी आनंद मेळा ठरणारे पहिले दीर्घकालीन उन्हाळी आवर्तन अखेर शुक्रवारी सायंकाळी सुरु झाले. जवळपास महिनाभर चालणारे हे आवर्तन सोडताना भंडारदरा धरणात 7 हजार 951 द.ल.घ.फू. तर निळवंडे धरणात 5 हजार 67 द.ल.घ.फू. पाणीसाठा होता. या आवर्तनासाठी भंडारदरा धरणाच्या विद्युतगृहाच्या वाटिकेद्वारे 837 क्युसेक तर निळवंडे धरणाच्या विद्युतगृह वाटिकेतून 850 क्युसेक आणि मोरीद्वारे 350 क्युसेक असा एकूण 1 हजार 200 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे.

