घरकुलाच्या नावाखाली उकळलेल्या रकमेची चौकशी करा! नेवासा तालुका काँग्रेसची मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा नगरपंचायतने सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीने घरकुलाच्या नावाखाली नागरिकांकडून उकळलेल्या रकमेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नेवासा काँग्रेसच्यावतीने नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, सन 2018 मध्ये नेवासा नगरपंचायतकडून विशिष्ट कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. या एजन्सीने सर्वांना घरकूल मंजूर करून देवू या नावाखाली शहरातील नागरिकांकडून प्रत्येकी चारशे रुपये उकळले. परंतु प्रत्यक्षात अद्याप अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. मागील काही दिवसांपूर्वी नेवासा काँग्रेसने नगरपंचायत हद्दीतील राहत्या जागा नावावर करुन द्याव्यात यासाठी पाठपुरावा केला होता. ज्यामुळे शासनाच्या घरकुलासारख्या योजनेचा लाभ सर्वांना मिळेल. यातूनच शहरातील नागरिकांकडून नगरपंचायतने नेमलेल्या एजन्सीने यापूर्वी घरकुल मिळवून देवू असे खोटे आश्वासन देत शहरातील नागरिकांकडून प्रत्येकी चारशे रुपये उकळले अशी तक्रार समोर आली.

याची दखल घेऊन नेवासा तालुका काँग्रेस समितीने नगरपंचायत पंचायत मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांची भेट घेऊन याविषयावर चर्चा करून विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी दिलेल्या निवेदनात सर्वेक्षण कोणत्या एजन्सीमार्फत करण्यात आले, सर्वेक्षणाचे उद्दिष्ट काय होते, किती कुटुंबांकडून पावत्या फाडण्यात आल्या, किती निधी गोळा करण्यात आला, निधी नगरपंचायतकडे जमा केला का, एजन्सीने नागरिकांना खोटे आश्वासन देवून निधी का उकळला, एजन्सीला हा अधिकार कोणी दिला, कोणाच्या आदेशावरून निधी गोळा केला, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
याबाबत लेखी स्वरूपात माहिती देण्यात यावी. अन्यथा नेवासा तालुका काँग्रेसकडून तीव्र आंदोलन आणि पैसे उकळणार्‍या एजन्सीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अध्यक्ष संभाजी माळवदे, शहर काँग्रेसचे रंजन जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे अंजुम पटेल, इम्रान पटेल, मुन्ना अत्तार, मुसा बागवान, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष रमेश जाधव, राजू पिंजारी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा पातारे, शोभा बोरगे, संदीप मोटे, युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, सचिन बोर्डे, सतीष तर्‍हाळ, सुदाम कदम, संजय होडगर, श्याम मोरे, संतोष बर्डे, भगीरथ दाणे आदिंसह शहरांतील नागरिकांनी दिला आहे.

Visits: 80 Today: 1 Total: 1112275

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *