गणेशवाडी शिवारात तब्बल चाळीस एकर ऊस जळून खाक सुमारे पंधरा लाखांचे पीक जळाल्याने शेतकर्यांना अश्रू अनावर
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील गणेशवाडी शिवारात विद्युत वाहिन्यांतून पडलेल्या ठिणगीने सतरा शेतकर्यांचा तब्बल चाळीस एकर ऊस जळून खाक झाला. महावितरणने थकबाकीच्या नावाखाली बरीच रोहित्रे बंद केल्याने आग शमवताना अडचण आली. अंदाजे दहा ते पंधरा लाखांचे पीक जळाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.
मंगळवारी (ता.15) दुपारी अडीच वाजता अरुण बाळासाहेब लोहकरे यांच्या गट क्रमांक 57 मधील उसाच्या पिकाने पेट घेतला. वारा वाहत असल्याने अवघ्या दहा मिनिटांत पूर्व व पश्चिम बाजूच्या शेतांत आग पसरली. महावितरणने बील वसुलीसाठी काही रोहित्रे बंद केल्याने आग विझविण्यास पाणी उपलब्ध नव्हते. राजेंद्र डौले, आदिनाथ दहिफळे, हरी काकडे, दिलीप लोहकरे, किरण लोहकरेंसह पन्नासहून अधिक युवकांनी उसाचे वाढे व झाडांच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
बाबासाहेब लोहकरे, नामदेव लोहकरे, एकनाथ मिसाळ, अॅड. सुनील गडाख, चांगदेव बेल्हेकर, सुभाष बेल्हेकर यांच्यासह एकूण सतरा शेतकर्यांचे चाळीस एकर ऊसपीक जळाले. गणेशवाडीचे सरपंच कैलास दरंदले, पोलीस पाटील संजय दहिफळे व ग्रामस्थांनी भेट दिली. मुळा कारखान्याच्या शेतकी विभागातील प्रवीण शेटे व नारायण दरंदले यांनी भेट देऊन सर्वांना तातडीने ऊसतोडीच्या पावत्या दिल्या. कामगार तलाठी रोहन पतंगे यांच्याशी संपर्क केला असता, कोतवाल आदिनाथ बेल्हेकर यांना घटनास्थळी पाठविल्याचे सांगितले. अंदाजे साडेतीन कोटी रुपयांच्या पिकाला आग लागली होती. ऊस जळाल्याने वजनात दहा ते वीस टक्के घट लक्षात घेता, सतरा शेतकर्यांचे दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उपस्थित शेतकर्यांनी वीज कंपनीच्या कारभाराबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या.