बीड जिल्ह्यात भीषण अपघातामध्ये सात जण ठार अंबाजोगाईकडे जाणार्या क्रूझर व ट्रकची समोरासमोर धडक

बीड, वृत्तसेवा
जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील सायगाव नजीक नंदगोपाल डेअरीजवळ लातूरहून अंबाजोगाईकडे जाणार्या क्रूझर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात क्रूझरमधील सहाजण जागीचं ठार झाले तर क्रूझर चालकाचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अक्षरशः महिला आणि बालकाचे धड वेगळे तुटून पडले होते.

लातूर येथील आर्वी गावातून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे कार्यक्रमासाठी जात असलेल्या गंगणे कुटुंबियांच्या क्रूझर गाडीचा (क्र. एम.एच. 24, व्ही. 8061) समोरून येणार्या ट्रक (क्र. आर.जे. 11, जी.ए. 9210) यांच्यात समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. हा अपघात सकाळी साडेदहा वाजता झाल्याची माहिती प्रथमदर्शनी नागरिकांनी दिली आहे. दरम्यान क्रूझर गाडीमध्ये 12 जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
![]()
दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर अक्षरशः रक्तमांसाचा सडा पडला. या अपघातात क्रूझर गाडीतील 5 महिला 1 बालक जागीच ठार तर एका पुरुषाचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतकांची अद्याप नावे समजू शकली नसून अपघातातील जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हा अपघात ओव्हरटेक करण्याचा नादात झाला असल्याची माहिती देण्यात आली असून अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, बर्दापूरचे पोलीस निरीक्षक खरात, अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
