संगमनेरचे ग्रामीण रुग्णालय की वैद्यकीय ‘कसाईखाना’? मृतदेहांच्या विटंबनेचा सिलसिला सुरुच; डॉ.प्रशांत थोरातांपाठोपाठ दुसरा ‘दानव’ही उघड..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणार्‍या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील संतापजनक प्रकारांची मालिका थांबायला तयार नाही. हॉटेल व्यावसायिक सिद्धांथा नितीनकुमार काद्री याच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या डॉ.प्रशांत थोरात यांचे दुष्कृत्य ताजे असतानाच, आता याच रुग्णालयातील दुसर्‍या एका वैद्यकीय अधिकार्‍याचा ‘यमराज’ अवतार समोर आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत या दुसर्‍या डॉक्टरनेही चक्क दोन तरुण मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यास नकार देऊन माणुसकीला हरताळ फासल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या प्रकाराने संगमनेरची शासकीय आरोग्य व्यवस्थाच व्हेंटीलेटरवर गेली असून जिल्हा शल्यचिकित्सक मात्र केवळ कागदी घोडे नाचवून या नराधमांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील प्रत्येक विकासकामात श्रेय शोधणार्‍या स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयावर साधलेली सोयीस्कर चुप्पीही वेगवेगळ्या चर्चांना कारणीभूत ठरत आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात 25 एप्रिल रोजी कळस येथील ज्ञानेश्वर राजेंद्र जावळीकर (वय 31) आणि 8 मे रोजी प्रतिक दत्तात्रय काशिद (वय 26, रा.वडगावपान) या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. शोकसागरात बुडालेल्या त्यांच्या नातेवाईकांना आधार देण्याऐवजी, ग्रामीण रुग्णालयातील या मुजोर डॉक्टरने ‘मृतदेह कुजला आहे’ असे लंगडे कारण सांगून त्यांचे विच्छेदन करण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, अतिशय गरीब असलेल्या मयताच्या कुटुंबीयांना स्वतःचा खिसा रिकामा करुन खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह लोणीला न्यावे लागले आणि त्यांचे विच्छेदन करावे लागले. धक्कादायक म्हणजे ज्या दिवशी सिद्धांथा काद्री याचा मृत्यू झाला होता, त्याच दिवशी वडगावपान येथील तरुणाच्या बाबतीतही हाच क्रूर प्रकार घडला होता.


कळस येथील तरुणाचा मृतदेह तासनतास पडून असताना, त्याच्या नातेवाईकांनी हलाखीच्या परिस्थितीचे गार्‍हाणे मांडताना शवविच्छेदनासाठी त्याला लोणीला नेण्यास असर्थता दर्शवली होती. मात्र, डॉक्टरी वेशातील या दुसर्‍या ‘पाषाणहृदयी’ वैद्यकीय अधिकार्‍यावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. शेवटी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीच आपल्यातील माणुसकी दाखवत पदर खर्च करुन त्या तरुणाचा मृतदेह विच्छेदनासाठी लोणीला नेला व संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा असतांनाही प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्याचे विच्छेदन करुन मयताला शेवटचा निरोप दिला. या घटनेतूनच रक्षक भक्षक बनल्याचे जिवंत उदाहरण उभे राहून ग्रामीण रुग्णालयाची लक्तरेही वेशीवर टांगली गेली होती.


घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय प्रामुख्याने तालुक्यातील गोरगरीब महिलांसाठी प्रसूती सुविधेचा मोठा आधार मानले जाते. सरकार या माध्यमातून मातामृत्यूचा दर कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, आता या विभागातूनही रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळले जात असल्याचे गंभीर आरोप होऊ लागले आहेत. गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार शासनाच्या नाकाखाली टिच्चून सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. संगमनेरमध्ये श्रेयवादासाठी दररोज एकमेकांसमोर उभे ठाकणारे दोन्ही लोकप्रतिनिधी या संवेदनशील विषयावर गप्प का? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. रुग्णालयात सामान्य माणसाची होणारी ही कुतरओढ थांबवण्यासाठी आणि या मुजोर डॉक्टरांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कधी जागी होणार, हा खरा प्रश्न आहे.


‘त्या’ दोन्ही डॉक्टरांना बडतर्फ करा..!
डॉ.प्रशांत थोरात आणि त्यांचे प्रतिरुप असलेल्या दुसर्‍या डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द करुन, त्यांच्यावर मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी घुलेवाडी रुग्णालयाच्या संपूर्ण कारभारावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करुन सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. शासकीय पगारावर डल्ला मारायचा आणि प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयांचे एजंट म्हणून काम करायचे, हाच इथल्या काही डॉक्टरांचा धंदा झाला आहे. गरिबांना खाजगी लॅब आणि रुग्णालयांकडे धाडणारी ही साखळी तोडण्याची वेळ आली आहे. संगमनेरचे ग्रामीण रुग्णालय सध्या स्वतःच व्हेंटिलेटर’वर असून, त्याला वाचवण्यासाठी प्रशासकीय शस्त्रक्रियेची नितांत गरज आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1798377

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *