राजकारणातलं ‘शैक्षणिक’ वळण की ‘संकेतांचा’ नवा महामार्ग? तांबेंचा ‘ट्रेलर’ आणि थोरातांची ‘पॅरलल’ वारी; काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा विनापरवाना ‘बदला’चे वारे?..


श्याम तिवारी, संगमनेर
राज्याच्या राजकारणात सध्या ऋतू कोणताही असो, हवामान मात्र कायम ‘बदलाचे’च असते. कधी पहाटेचा शपथविधी होतो, तर कधी दुपारच्या वेळी पूर्ण पक्षच दुसर्‍याच्या मांडवात जाऊन बसतो. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात जेव्हा काँग्रेसचे ‘संयमी’ आणि ‘शालीन’ नेतृत्व मानले जाणारे बाळासाहेब थोरात अचानक भाजपचे संकटमोचक चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात प्रकटतात, तेव्हा चर्चा केवळ वार्‍यासारखी पसरत नाही, तर ती वावटळ बनते. थोरातांनी जरी या भेटीला ‘शैक्षणिक कामासाठी झालेली भेट’ असा मुलामा चढवला असला, तरी राजकारणात ‘शाळा’ कुणी कुणाची घेतली, यावरुन सोशल माध्यमातील चर्चांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विधानसभेतील पराभवानंतर झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतून राजकीय पुनर्वसन होईल अशी अपेक्षा असताना, काँग्रेसकडून साध्या नावाचाही विचार न झाल्याने माजीमंत्री बाळासाहेब थोरात नाराज असल्यासह पक्षातील दुफळीही या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चांगलीच उलथापालथ घडत असल्याने येणार्‍या कालावधीत राज्यात राजकीय भूकंप होण्याचेही संकेत मिळत आहेत.


या भेटीनंतर राज्यात राजकीय उत्सुकता निर्माण झाल्याने ती चांगलीच चर्चेत आली. त्यामुळे पत्रकारांनाही या भेटीचा पाठलाग करावा लागला. त्यातून विचारल्या गेलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काही प्रश्नांच्या संदर्भात ही भेट घेतल्याचे सांगितले. मात्र त्यांचे उत्तर राजकीय सारवासारव असल्याचे जाणकारांचे मत असून गेल्या अनेक दशकांपासून सहकार आणि शिक्षणाचं साम्राज्य उभं करणार्‍या थोरातांना अचानक इंजिनिअरिंगच्या प्रश्नांसाठी ‘दादां’ची आठवण झाल्याने आश्‍चर्य निर्माण झाले आहे. त्यातूनच शैक्षणिक प्रश्‍नांच्या नावाखाली थोरातांकडून भाजपच्या ‘महामार्गा’कडे जाणारा नवा मार्ग तर शोधला जात नाही ना? अशा शंकाही उपस्थित झाल्या आहेत.


ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याशी ‘मृदू’ संवाद साधण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्याशी झालेल्या संवादातून ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या नेत्यांचे ‘वैचारिक परिवर्तन’ झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे, या भेटीत अभियांत्रिकीच्या पुलापेक्षा राजकीय ‘ब्रिज’ बांधण्यावरच जास्त चर्चा झाली असावी, अशी सोशल माध्यमात चर्चा आहे. या घडामोडींकडे पाहता ‘पदवीधर’च्या निवडणुकीतच सत्यजित तांबे यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसला ‘टांग मारून’ अपक्ष उमेदवारी लढवली आणि त्यांच्या या प्रयत्नांना देवेंद्र फडणवीसांची सुप्त साथ लाभली, तिथूनच या कुटुंबाची पावलं ‘कमळा’च्या दिशेने पडू लागल्याची चर्चा सुरु झाली होती. तांबे परिवाराच्या या भूमिकेने त्यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात खरोखरी नाराज होते की त्यांनी केवळ तसा आभास निर्माण केला होता हे कोडे आजही सुटलेले नसताना झालेली ही भेट नव्या राजकीय चर्चांना जन्म घालणारी ठरली आहे.


आमदार सत्यजित तांबे भाजपच्या ‘हमरस्त्या’वरुन धावत असताना बाळासाहेब थोरात मात्र पायवाटेने चालल्याचं चित्र गेल्या दीड वर्षांपासून बघायला मिळत होते. पण आता दादांच्या दरबारातील हजेरीने ती पायवाट आणि हमरस्ता एकाच चौकात एकत्र येताना दिसत आहेत. ‘आमचं घराणं काँग्रेसशी एकनिष्ठ आहे’ असं म्हणणार्‍या थोरातांच्या मनात, पक्षाने गेल्या काही निवडणुकांनंतर केलेली दुर्लक्षिता आणि अंतर्गत गटबाजीची सल नक्कीच असावी. ज्या पक्षात स्वतःचेच प्रदेशाध्यक्ष आपल्या विरोधात फिल्डिंग लावतात, तिथे किती काळ ‘गांधी’ विचारांची मशाल तेवत ठेवायची, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.


राज्यातील बदलती राजकीय स्थिती पाहता, आज जे ‘अशक्य’ वाटतं, ते उद्या ‘अटळ’ होऊन समोर येण्याची अधिक शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी ‘शिवधनुष्य’ नेलं, दिवंगत अजित पवारांनी ‘घड्याळ’ लावलं, आता थोरातांनी ‘हात’ सोडून ‘कमळ’ हाती घेतलं तर नवल वाटायला नको. सध्याच्या राजकारणात ‘विचारधारा’ हा शब्द केवळ शब्दकोशात उरला असून, राजकीय ‘सोय’ हाच मुख्य मंत्र झाला आहे. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या प्रश्नांचे ‘पॉलिटिकल मॅकेनिक’ असलेल्या चंद्रकांत दादांच्या या भेटीतून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची शैक्षणिक सोय होते की, राजकीय यावरील चर्चेला धुमारे फुटले आहेत.


राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते बाळासाहेब थोरात जुन्या वळणाचे आहेत. त्यांच्याकडून सहजासहजी कोणताही निर्णय होत नाही. अशा स्थितीत त्यांनी ‘दादां’च्या भेटीला प्राधान्य देणं संगमनेरसह राज्यातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारं आहे. थोरातांची ही ‘अभियांत्रिकी वारी’ काँग्रेसच्या गोटात ‘खळबळ’ निर्माण करणारी असून यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वपक्षातील आपल्या राजकीय हितशत्रूंना अबोल चपराक दिल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. या भेटीचे फलित एव्हढ्यात समोर येण्याची शक्यता कमी असून भविष्यात मात्र थोरातांच्या अंगावर भगवे उपरणे दिसल्यास आश्‍चर्य निर्माण होणार नाही.

Visits: 4 Today: 4 Total: 1800004

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *