संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणार्या रस्त्यांवर अतिक्रमण कायमस्वरुपी रस्ते मोकळे करा, अन्यथा उपोषण ः देशमुख

नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणारे व अडथळे निर्माण करणारे रस्ते कायमस्वरुपी मोकळे करा. या मागणीकडे नेवासा नगरपंचायतने दुर्लक्ष केल्याने त्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून (ता.17) बेमुदत धरणे आंदोलन व चक्री उपोषण करण्यात येईल असा इशारा संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे मुख्य मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख यांनी मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्यावतीने शिवाजी महाराज देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, नेवासा शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणारे मुख्य रस्ते वाहतुकीस कायमस्वरुपी मोकळे करावे म्हणून 22 डिसेंबर 2022 रोजी निवेदन दिले होते. परंतु आजपर्यंत आम्ही दिलेल्या निवेदनातील मागणीवर नेवासा नगरपंचायतने कोणतीही कार्यवाही केलेली आमच्या दृष्टीक्षेपात आलेली नाही. याचा सरळ अर्थ असा की, वारकर्यांच्या व माऊली भक्तांच्या कायदेशीर व न्याय मागणीचा कुठलाही विचार नगरपंचायत प्रशासन व इतर संबंधित विभागांनी केलेला नसल्याने नगरपंचायतच्या अकार्यक्षमतेचा आम्ही निषेध करत आहोत असे निवेदनातून स्पष्ट केले आहे.

मंदिराकडे येणारे सर्व हमरस्ते अतिक्रमणमुक्त करून रहदारीसाठी आठवड्यातील सर्व दिवसांसाठी खुले करावे. या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान भक्त मंडळ, ग्रामस्थ, वारकरी व समर्पण फाउंडेशन यांचेसह 17 जानेवारीपासून नगरपंचायतच्या मुख्य चौकात बेमुदत धरणे आंदोलन व चक्री उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

नेवासा नगरीत राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र येथील श्री खोलेश्वर मंदिरापासून ते नगरपंचायत चौक ते ज्ञानेश्वर मंदिर रस्ता या मार्गावर मध्येच दुकाने लावल्याने अडथळे निर्माण होत आहे. परिणामी वाहन चालकांसह भाविकांची मोठी कुचंबना होत आहे. त्यामुळेच वारकरी व नागरिक रस्त्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
