पन्नासच्या नोटा देणारे संगमनेर मर्चंटस्चे ‘50:50’ एटीएम ग्राहकांसाठी रूजू
पन्नासच्या नोटा देणारे संगमनेर मर्चंटस्चे ‘50:50’ एटीएम ग्राहकांसाठी रूजू
‘ग्रीन पिन आणि कार्ड सेफ’ नाविन्यपूर्ण सेवाही सुरू; ग्राहकांतून जोरदार स्वागत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर मर्चटस् बँकेने मुख्य शाखेत तिसरे एटीएम ग्राहकांच्या सेवेत रुजू केले आहे. या एटीएमचे वैशिष्ट्य म्हणजे या मशीनद्वारे फक्त 50 रुपयांच्या नोटा ग्राहकांना मिळणार आहेत. अशा प्रकारचा अनोखा प्रयोग करणारी संगमनेर मर्चंटस् बँक ही सहकारी बँकिंगमधील पहिलीच बँक ठरली आहे. ग्राहकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या व्यावहारिक अडचणी दूर कराव्यात, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी केले आहे.
सध्या सर्व बँकांच्या एटीएम मशीन्समधून ग्राहकांना केवळ दोन हजार, पाचशे व शंभर रुपायांच्याच नोटा मिळतात. मात्र त्यामुळे सर्वसाधारण एटीएम धारकांना व्यवहारात अडचणी येत होत्या. किरकोळ व्यवहार करतानाही मोठ्या नोटा मोडाव्या लागत असत. अनेकदा दुकानदारांकडे सुटे पैसे नसल्याने त्यात वेळ वाया जात असे. ही समस्या ओळखून संगमनेर मर्चंटस् बँकेने मुख्य शाखेतील अविरत सेवा देत असलेल्या दोन एटीएम शेजारीच हे तिसरे 50:50 म्हणजे फक्त 50 रुपयांच्या नोटादेणारे एटीएम बसवले आहे.
अविरत एटीएम सेवा देण्यात संगमनेर मर्चंट्स बँकेचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. ग्राहकांच्या नेमक्या गरजा ओळखून त्यानुसार सेवा पुरविण्यात बँक सतत आघाडीवर असल्याचे बँकेने पुन्हा सिध्द केले आहे. या एटीएम मशीनमुळे बाजारपेठ शाखा, घुलेवाडी शाखा यासह बँकेच्या संगमनेरमधील एटीएम मशीन्सची संख्या पाच झाली आहे. ही सर्व एटीएम मशीन्स ‘सुपरहिट’ ठरली आहेत. सिन्नर, राहाता, अकोले व चाकण शाखेतील अविरत एटीएम सेवाही तेथील ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. या एटीएममधून दर महिन्यास लकी-ड्रॉद्वारे बक्षीस काढले जाणार आहे. ग्राहकांनी याचाही फायदा घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष संतोष करवा यांनी केले आहे.
‘ग्रीन पिन आणि कार्ड सेफ’
अहमदनगर जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण सेवा संगमनेर मर्चंटस् बँकेनेच प्रथम ग्राहकांना देऊ केल्या आहेत. आता ‘ग्रीन पिन’ सुविधा आणि ‘कार्ड सेफ’ सुविधा या दोन अत्यंत उपयुक्त सुविधा बँकेने आणल्या आहेत. विशेष म्हणजे या सेवा पूर्णपणे विनामूल्य आहेत. सध्या ग्राहक जर त्याच्या एटीएमचा पिन विसरला तर किमान आठ दिवस त्याला एटीएम वापरता येत नाही. संबंधित बँकेकडे विनंती अर्ज करून पिन मिळविण्यासाठी शंभर रुपये भरावे लागतात. मात्र आता ग्रीन पिनचा पर्याय निवडला की बँकेशी संलग्न असलेल्या ग्राहकाच्या मोबाईल वर तात्काळ ओटीपी मिळणार व ग्राहक आपल्या इच्छेनुसार पिन सेट करून लगेच एटीएमच्या माध्यमातून व्यवहार सुरु करू शकेल अशी ही सुविधा आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरी नाविन्यपूर्ण सेवा आहे ‘कार्ड सेफ’. शंभर टक्के सुरक्षा देणारे हे अॅप विकसित केले आहे. हॅकिंगपासून शंभर टक्के वाचविणारे हे अॅप म्हणजे वरदान ठरणार आहे.