संगमनेरच्या नदीपात्रात दारुड्यांचा धुडगूस! महिलांची उघड छेडछाड; सुरक्षादलाचे पथक कागदावरच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या उष्णतेने उच्चांक गाठलेला असताना अमृतवाहिनी मात्र वाहती असल्याने दररोज संध्याकाळी प्रवराकाठाला जत्रेचे स्वरुप प्राप्त होत आहे. त्यातच शाळांना सुट्ट्या आणि भाचे कंपनीचे आगमन यामुळे साईमंदिर ते गंगामाईचा परिसर अक्षरशः महिला, मुली, मुलं आणि माणसांनी गजबजून गेल्याचे चित्रही दिसत आहे. मात्र अशा गर्दीच्या ठिकाणावरही समाजातील विकृत आणि नशेबहाद्दरांचे अड्डे सहीसलामत असून त्यांच्या अश्लिल करामतींनी अतिशय पवित्र असलेला अमृतवाहीनीचा काठ काळवंडला आहे. सायंकाळच्या सुमारास अबालवृद्धांची दाटी असतानाही 15 ते 20 दारुड्यांचे टोळके नशेत झिंगून गंगामाईच्या पवित्र पात्रात अक्षरशः धुडगूस घालीत असल्याचे संतापजनक दृष्यही समोर येत आहे. अतिशय संतापजनक या प्रकाराला विरोध करणार्या काही नागरिकांना धमकावल्याचा प्रकारही मंगळवारी घडला असून या सर्व घडामोडींपासून महिला सुरक्षेचा मोठा गाजावाजा करुन लाखों रुपयांची उधळपट्टी करीत तैनात केलेले सुरक्षा पथक मात्र अनभिज्ञ असल्याचे वास्तवही उघड झाले आहे. आता शहर पोलिसांनीच या प्रकारांची गांभीर्याने दखल घेवून दारुच्या नशेत नदीपात्रात धुडगूस घालणार्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, अन्यथा एखाद्या प्रकरणातून शहराची सामाजिक शांतता बाधित होण्याचीही दाट शक्यता आहे.

राज्यात उष्णतेने सध्या कहर केला असून संगमनेरचा पाराही हंगामात पहिल्यांदाच 42 अंशावर पोहोचला आहे. प्रचंड उष्णतेमुळे शरीराची लाही होत असून त्यातून दिलासा मिळवण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात संगमनेरकर अमृतवाहीनीच्या काठावर मोठी गर्दी करीत असतात. मुलांना सुट्ट्या आणि भाचे कंपनीचे मामाच्या गावी आगमन अशा एप्रिल-मे महिन्यात भंडारदरा-निळवंडे धरणाचे आवर्तनही सुरु राहात असल्याने संगमनेरचे नदीपात्र म्हणजे अबालवृद्धांसाठी पर्वणीच असते. त्यातच सध्या पालिकेकडून नदीसुधारच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्राचीन व ऐतिहासिक घाटांचे काँक्रीटीकरण सुरु असल्याने पात्रात उतरणारे अनेक घाट धोक्याचे बनले आहेत. त्यातही गेल्या दीड-दोन दशकांत झालेल्या प्रचंड वाळू उपशाच्या कारणाने संपूर्ण नदीपात्रच धोकादायक बनल्याने कधीकाळी वडाखालच्या पात्रात जलमस्तीचा आनंद घेणारी कुटुंब आता गंगामाईच्या परिसरात गर्दी करताना दिसत आहे.

आवर्तनाच्या कालावधीत रोज सायंकाळी चार वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत गर्दीने ओसंडणार्या गंगामाई घाटांच्या परिसरात पाण्याची पातळी कमी आणि पाण्याचा वेगही नियंत्रित असल्याने तेथे लहान मुलांसह मुली व महिलाही पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतात. मात्र यंदाच्या आवर्तनाला शहरातील काही विकृत आणि दारुड्यांची नजर लागली असून गेल्याकाही दिवसांपासून ऐन गर्दीच्यावेळी 15 ते 20 दारुड्यांचे टोळके नशेत धुंद होवून अबालवृद्धांची गर्दी असलेल्या याच घाटावरील पाण्यात धुडगूस घालून आरडाओरड आणि धिंगाणा करीत असल्याचे संतापजनक चित्र दिसू लागले आहे. दारुच्या नशेत झिंगलेल्या या टोळक्याकडून आंघोळीसाठी नदीत उतरलेल्या मुली व महिलांच्या छेड काढण्याचे प्रकारही अलिकडे घडू लागले असून मंगळवारी तर या टोळक्यातील काहींनी पात्रात आंघोळ करणार्या मुलींच्या अंगावर धावून जात अश्लिल चाळे करण्यापर्यंत मजल गेल्याचे दिसून आले.

या टोळक्याकडून अशाप्रकारचा धुडगूस सुरु असताना काही जागृक नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या संख्येने असलेल्या या गुंडांकडून त्यांनाच दमदाटी झाल्याचीही चर्चा कानावर आली आहे. सायंकाळी गर्दीच्यावेळी रोजच घडत असलेल्या या प्रकारांना रोखण्याची जबाबदारी भासवून कार्यान्वीत करण्यात आलेले पालिकेचे महिला सुरक्षा पथक मात्र कोठेही दृष्टीस पडत नसल्याचे वास्तवही मंगळवारी समोर आले आहे. अशा प्रकारांमधून एखाद्या महिलेचा विनयभंग होण्याची अथवा दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून त्यातून शहराचे सामाजिक स्वास्थही धोक्यात येवू शकते. महिला सुरक्षारक्षक हा विषय पालिकेच्या प्रतिष्ठेचा असल्याने त्यांच्या भरवशावर राहून पोलिसांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये, अन्यथा एखादी घटना शहरात तणावाचे कारण घडू शकते. त्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी ओळखून आवर्तनाच्या कालावधीत दररोज सायंकाळी प्रवराकाठावर आवश्यक बंदोबस्त तैनात करुन नशेबहाद्दरांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे.

दरवर्षी उन्हाळी आवर्तनाचा दीड-दोन महिन्यांचा काळ संगमनेरकरांसाठी पर्वणीचा ठरतो. या कालावधीत उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासह पाहुण्या आलेल्या भाचे मंडळींना घेवून संगमनेरकर सहपरिवार नदीकाठी गर्दी करतात. अनेकजण आपल्या मुलांना घेवून पात्रात आंघोळीचीही मजा घेत असतात. अलिकडच्या काळात नदीपात्रात उतरुन जलक्रीडा करण्यात मुली व महिलांची संख्याही वाढल्याने समाजातील विकृतही सक्रिय झाले आहेत. त्यातील एक टोळके गंगामाई घाटावरच धुडगूस घालीत असून त्यांच्या त्रासाने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. एखाद्या घटनेची प्रतिक्षा करण्याऐवजी पोलिसांनी वेळीच त्यांच्या नांग्या ठेचल्यास त्यांच्या कृत्यातून निर्माण होणारी सामाजिक असुरक्षेची भावना नष्ट होवू शकते, अन्यथा एखादीही घटना शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्यास कारणीभूत ठरेल.

