आठ दिवसांत ठाकरे सरकारची तिसरी ‘विकेट’ पडणार! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा; ‘लॉकडाउन’वरुनही साधला निशाणा
मुंबई, वृत्तसंस्था
एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. भाजपाने हे प्रकरण लावून धरल्यावर गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. यापाठोपाठ 100 कोटींच्या वसुलीबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान येत्या आठ दिवसांत तिसरी विकेट पडेल असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथून व्हर्च्युअल माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. मंत्र्यांनी काही केलं नाही असं खोटं बोलत आहात. कोर्टाने ठोकलं की राजीनामा घेत आहात एक नाही आणि दोन राजीनामे झाले आणि येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार आहे. काल एकाने चांगली कमेंट केली की 36 बॉलमध्ये दोन विकेट आणि उरलेल्या विकेटचं काय. उरलेल्यांची रांगच लागणार आहे. तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात. पण सर्वसामान्यांचं नुकसान करु नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
2014 मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 122 जागा आपल्याला मिळाल्या. त्यावेळेला आपण एकटे लढून देखील 1 कोटी 47 लाख मतं मिळाली. 2019 मध्ये आपल्याला 164 जागा लढण्यासाठी मिळाल्या तरी 1 कोटी 42 लाख मतं मिळाली. 100 जागा कमी लढवून देखील जर आपण 1 कोटी 42 लाख मतं मिळवू शकतो तर 288 जागा मिळाल्यानंतर दोन कोटींचा टप्पा पार करु शकतो. 2024 मध्ये सगळ्या जागा लढवत स्वबळावर सरकार आणायचं आहे, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारकडून फसवणूक झाली असून लोक त्यांना माफ करणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी शनिवारी, रविवारी कडक आणि इतर दिवशी मिनी लॉकडाउन करु अशी चर्चा झाली. पण प्रत्यक्षात पूर्ण लॉकडाउनचं परिपत्रक काढलं. भाजपा हे सहन करणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. नियमावली करताना सर्वसामान्य जगणार कसा हे देखील पाहिलं पाहिजे. मातोश्रीत बसून लॉकडाउन करणं सोपं आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली.