गटारगंगेने डागाळली ‘संगमनेरची’ प्रागैतिहासिक ओळख! वैभवशाली शहराचे वास्तव; शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रवरा आणि म्हाळुंगी अशा दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमनेर शहराला मोठी पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अगदी प्रभू श्रीरामचंद्रांपासून ते अगदी १९५९ सालच्या इंदिरा गांधी यांच्या भेटीपर्यंत अनेक विभूतींचा पदस्पर्श झालेल्या या नगरीला संगमनेर असं नाव देणार्‍या नद्यांनाही स्वतःचा प्रगल्भ इतिहास आहे. समुद्र मंथनात राऊ नावाच्या दानवाने प्राशन केलेले अमृत श्रीहरी नारायणाने त्याच्या कंठातून पुन्हा प्रवाहित केले. त्यातून प्रवाहित झालेली धार म्हणजेच पयोधरा अर्थात अमृतवाहिनी असा उल्लेख मत्स्यपुराणात आढळतो. सह्याद्रीतील अडथळे ओलांडून अगस्त्य ऋषींच्या आश्रमाला स्पर्श करीत गोदावरीच्या भेटीला निघालेल्या या प्रवाहात पुढे मंगळापूरजवळ आढळा तर, संगमनेरनजीक म्हाळुंगीसह चार नद्या येवून मिसळतात. त्यावरुन पुराणात ‘संगमिका’ आणि हल्लीचे ‘संगमनेर’ असे नाव धारण करणार्‍या या प्रागैतिहासिक शहरात आता नगरपालिकेने प्रवाहित केलेल्या पाचव्या गटारगंगेचाही समावेश झाल्याने वैभवशाली म्हणवून घेणार्‍या संगमनेरची प्रगल्भ प्रागैतिहासिक ओळख डागाळली गेली आहे.

अमृतवाहिनी प्रवरेच्या काठावर वसलेला संगमनेरचा संपूर्ण परिसर दंडकारण्यात मोडत असल्याचे पौराणिक दाखले सांगतात. इ.स.पूर्व २०० वर्ष या भागात मानवी वसाहती होत्या. काही दशकांपूर्वी जोर्वे येथील उत्खनानातून इ.स.पूर्व १५०० ते इ.स.पूर्व ५०० या काळातील मानवी वास्तव्याचे ठळक पुरावे भारतीय पुरातत्व संशोधन विभागाला सापडले होते, त्यावरुन या संपूर्ण परिसराचे प्राचिनत्व अधोरेखीत होते. संगमनेर शहर ज्या प्रवरानदीच्या काठावर वसले आहे, त्या नदीचा इतिहासही अनादी काळापासूनचा आहे. समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे देवाधिकांना वितरण सुरु असताना राऊ नावाच्या दानावाने वेशांतर करुन देवांच्या पंक्तीत अमृत मिळवून प्राशन केले. ही गोष्ट चंद्रदेवाने पाहिल्यानंतर त्याने श्रीहरी नारायणाला सांगितली. त्यांनी सुदर्शन चक्राने राऊचे शिर धडावेगळे केले, ते ज्याठिकाणी जावून पडले त्या शहराचे आजचे नाव राहुरी. तर, त्याचे धड यशोधरेचा उगम असलेल्या रतनगडावर येवून पडले.

त्या दानवाने अमृत प्राशन केल्याने तो अमर होता. त्यामुळे श्रीहरींनी रतनगडावर पडलेल्या त्यांच्या धडावरील कंठ आपल्या पायाच्या अंगठ्याने दाबून त्याच्या पोटातील अमृत बाहेर काढले. त्या अमृताची धार यशोधरेच्या पाण्यात पडून प्रवाहित झाल्याने यशोधरेची पयोधरा (पायाने प्रवाहित झालेली.) आणि त्यातून अमृत वाहिल्याने अमृतवाहिनी बनली असा दाखला मत्स्यपुराणात आढळतो. रामायाणात याच नदीच्या काठाने प्रभू श्रीरामचंद्रांचा संचार झाला होता. रावणाचा प्रतिकार करणार्‍या जटायू पक्षानेही याच नदीच्या आश्रयातून हवेत झेप घेतली होती. इतका प्रगल्भ प्रागैतिहासिक आणि पौराणिक, ऐतिहासिक वारसा घेवून वाहणार्‍या या नदीला संगमनेरनजीक अकोले तालुयातील म्हाळुंगे येथून उगम पावणारी म्हाळुंगी येवून मिळते. त्यावरुनच पुराणात संगमिका, तर आता संगमनेर असे या शहराला नावं पडले.

म्हाळुंगी नदी शहरात येतायेता अकोले नायाजवळ तिला म्हानुटी नदी येवून मिळते. तर, पुढे पुणे नायाजवळ नाटकी नदीही येवून मिसळते. कधीकाळी स्वच्छ आणि मधूर पाण्याचा प्रवाह असलेल्या म्हानुटी आणि नाटकी या दोन्ही नद्या आज शहरातील सांडपाणी वाहून नेणारे सर्वात मोठे नाले बनल्या आहेत. शहराला निळवंडे धरणातील पाण्याची थेट लाईन येईपर्यंत प्रवरापात्रातूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतं. त्याच पद्धतीने आजही प्रवरेच्या आवर्तनावर खांजापूर, सुकेवाडी, निंभाळे, समनापूर, वाघापूर, खराडी सारख्या अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना पुणे नायाच्या पुढील भागात कार्यान्वित आहेत. संगमाजवळ अमृतवाहिनी प्रवरेच्या पात्रात म्हाळुंगीतून वाहून आलेले म्हानुटीतील, बालमघाटाजवळ गावगटारीतील सांडपाणी तर, त्याच्या पुढ्यातच नाटकी नाल्याचे सांडपाणी थेट प्रवरा नदीच्या वाहत्या प्रवाहात मिसळले जाते. त्याचा परिणाम आवर्तनावरच अवलंबून असलेल्या वरील गावांच्या पाणी योजनांमधून हेच मलमीश्रित पाणी उचलले जात असल्याने तेथील नागरीकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.

संगमनेर नगरपालिकेने आजवर हजारो कोटी रुपये खर्च करुन शहरात प्रचंड विकासकामे केल्याचा ढोल वाजवला जातो. वास्तवात संपूर्ण शहरातून जमा होणारे मलमीश्रित सांडपाण्याची स्वतंत्र प्रक्रिया यंत्रणा उभारण्यात मात्र पालिका सपशेल अपयशीच ठरल्याचे धडधडीत सत्य आजही उघड्या डोळ्यांना दिसते. त्यामुळे स्वतःला वैभवशाली म्हणून मिरवून घेणार्‍या संगमनेरच्या सौंदर्याला डागच लागला असून थेट मानवी आरोग्याशी निगडीत या विषयावर पालिकेची अक्षम्य उदासीनता प्रागैतिहासापासूनचा प्रगल्भ वारसा वाहणार्‍या अमृतवाहिनीची विटंबना करणारा आहे.

जवळपास १०० कोटी रुपये खर्चाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर होवून दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. हा प्रकल्प ज्या भागात प्रस्तावित आहे त्या जोर्वेनायावरील रहिवाशांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. विकासकामांची घाई असलेल्या पालिकेने मात्र त्याआधीच कोट्यवधी रुपयांची उधळण करीत गावभरातील गटारांचे रोख त्या दिशेने नेले आहेत. आता या प्रकल्पाची जागा बदलली गेल्यास नव्याने बांधलेल्या गटांसाठी खर्च झालेला कोट्यवधींचा खर्च त्याच गटारातून वाहून जाईल. त्यातच हा मुद्दा पालिका निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरण्याची शयता असल्याने येणार्‍या मोठ्या कालावधीत या प्रकल्पाबाबत कोणतीही हालचाल होण्याची सुतराम शयता नाही.

Visits: 19 Today: 1 Total: 79526

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *