बंद घराचे कुलूप उघडून मालदाड रोडवर सव्वापाच लाखांची चोरी! सीसीटीव्हीमुळे चोरट्यांकडून उपनगरे लक्ष्य; नागरिकांमध्ये चोरट्यांची भीती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील समृद्ध शहरात गणना होणार्‍या संगमनेरात गुन्हेगारी घटनांचीही मोठी भरमार आहे. मात्र गेल्या महिन्यात गावठाणातील बहुतेक भागात उच्च तंत्रज्ञानाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने जून्या शहरातील अशा घटनांमध्ये काहीअंशी घट झाल्याचे समोर येत आहे. मात्र त्याचवेळी चोरट्यांनी शहराचा गावठाण टाळून आता उपनगरे लक्ष्य करायला सुरुवात केल्याचे चित्र गुरुवारी समोर आले. मालदाड रोडवरील गणेशविहार वसाहतीत हे स्पष्ट करणारी घटना घडली असून मारुती उगलमुगले यांचे बंद घर भरदिवसा उघडून चोरट्यांनी तब्बल सव्वापाच लाख रुपयांची रोकड लांबविली आहे. या वृत्ताने संगमनेरच्या उपनगरांमध्ये खळबळ उडाली असून चोरट्यांनी भिती निर्माण झाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती हंसाराम उगलमुगले हे गृहस्थ मालदाड रोडवरील गणेशविहार या वसाहतीमध्ये राहतात. गुरुवारी (ता.10) काही कामानिमित्त ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सकाळी सव्वादहा ते पावणेबाराच्या सुमारास आपला बेत साधला. उगलमुगले यांच्या घराची एकप्रकारे पूर्ण माहिती असलेल्या चोरट्याने सुरुवातीला त्यांच्या स्वयंपाकगृहाची कडी उघडून घरात प्रवेश मिळविला. मात्र तेथून घरात जाणारा दरवाजा बंद असल्याने चोरट्याने फ्रिजच्या कव्हरमध्ये लपवून ठेवलेली मुख्य दरवाजाची चावी सहज हुडकून काढली.

स्वयंपाकगृहातून बाहेर पडून त्या चोरट्याने पुन्हा मुख्य प्रवेशद्वारावर येवून चावीच्या सहाय्याने घराचा दरवाजा उघडला व हॉलमधील शिलाई यंत्रावर ठेवलेली पैशांची पिशवी घेवून तेथून पोबारा केला. या पिशवीत उगलमुगले यांनी पाचशे, दोनशे, शंभर व पन्नासच्या नोटा मिळून एकूण 5 लाख 25 हजार रुपयांची रक्कम ठेवली होती. घरी आल्यानंतर स्वयंपाकगृह व घराचा उघडा असलेला दरवाजा पाहून त्यांना धक्काच बसला. घरात जावून त्यांनी पैशांची पिशवी तपासली असता नेमकी तीच गायब असल्याचे निदर्शनास येताच त्यांना रडू कोसळले. याबाबत दुपारी उशीराने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात येवून घडली घटना कथन केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ त्यांच्या घरी जावून पाहणी केली व आवश्यक पुराव्यांची जुळवाजुळव करीत अज्ञात चोरट्याविरोधात भा. दं. वि. कलम 380 अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

राज्याचे महसूल मंत्री व संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे 15 लाख रुपये खर्च करुन गेल्याच महिन्यात जुन्या शहरातील विविध भागात उच्च तंत्रज्ञानाचा वापर असलेले एकूण 39 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. सदर कॅमेर्‍यांचे संचलन सुरु झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये काहीअंशी घट होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत असताना चोरट्यांनी आता सुरक्षित भागाची निवड करताना शहराच्या उपनगरांच्या परिसराला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे या घटनेतून समोर आले. त्यामुळे सीसीटीव्हीमुळे एकीकडे जुन्या शहराला दिलासा मिळाला असताना उपनगरांत मात्र चोरट्यांनी भीती निर्माण केल्याचे विरोधाभासी चित्र सध्या शहरात निर्माण होवू लागले आहे.

Visits: 220 Today: 3 Total: 1103710

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *