मस्करी केल्याच्या वादातून राहात्यात दोन गटांत हाणामारी

मस्करी केल्याच्या वादातून राहात्यात दोन गटांत हाणामारी
खुनाचा प्रयत्न केल्यासह अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राहाता
मस्करी केल्याच्या कारणावरुन रविवारी (ता.13) दोन गटांत झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न झाला आहे. एका बावीस वर्षीय युवकावर चाकूने वार करून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसर्‍या फिर्यादीवरुन लाकडी दांड्याने व गजाने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.


ब्रम्हा दत्तप्रसाद शिंदे (वय 22, रा.नवनाथ नगर, राहाता) याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, रविवारी (ता.13) पावणे चार वाजेच्या सुमारास तुषार भोसले हा माझी मस्करी करीत होता. माझी मस्करी करायची नाही असे त्याला म्हणालो असता त्याचा राग येऊन भोसले याने त्याचे मित्र योगेश वाघमारे, संदीप काकडे, सोन्या जाधव पूर्ण नाव माहीत नाही व इतर सहा लोकांना बोलावून घेतले. या सर्वांनी मला मारण्यास सुरुवात केली. मी प्रतिकार केला असता यातील योगेश वाघमारे याने तुला जिवंत सोडत नाही, मारून टाकतो असे म्हणत कमरेतून एक चाकू काढला आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूचा वार केला.


या मारहाणीत मी (ब्रह्मा शिंदे) जमिनीवर कोसळलो असता आरोपींनी पुन्हा माझ्यावर वार केला. तो वार चुकविण्यासाठी मी हात मध्ये घातला असता माझ्या उजव्या हाताच्या करंगळीला चाकू लागला. त्यानंतर संदीप काकडे याने मला लाथेने मारण्यास सुरुवात केली. इतर जमलेल्या सहाजणांनी सुद्धा मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारानंतर कसाबसा मी घरी आलो. मामासोबत पोलीस ठाण्याला येण्यास निघालो असता यातील तुषार भोसले, योगेश वाघमारे व काकडे यांनी ‘तुम्ही जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाची तक्रार देतो अशी धमकी दिली.’ मी शिर्डी येथे उपचारासाठी दाखल असताना आरोपींनी कोयता, काठ्या, लाकडी दांडे व दगड घेऊन घरावर दगडफेक केली. तसेच मामा सोमनाथ लोंढे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून जखमी केले. तसेच कुटुंबातील इतर लोकांनाही मारहाण केलीस असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यावरुन पोलिसांनी तुषार भोसले, योगेश वाघमारे, संदीप काकडे, सोन्या जाधव, अक्षय पगारे, रोहित पगारे, आकाश गायकवाड, शुभम वाघमारे यांच्यासह दोन-तीन जणांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक 484/2020 भादंवि कलम 307, 324, 504, 506, 143, 147, 148, 149 व 04:25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.


दुसरी फिर्याद विनयभंग झालेल्या महिलेने दिली आहे. यात म्हंटले आहे की, ब्रह्मा शिंदे, भूषण लोटे, शिवाजी लोटे, सोमनाथ लोटे, भैय्या सोमनाथ लोटे, अविनाश शिवाजी लुटे (सर्व रा.राहाता) यांनी आमचे घरात येऊन माझे आईस तुझा नातू तुषार भोसले हा कुठे आहे, त्याने ब्रह्माला मारहाण केली आहे असे म्हणाले. तो घरात नाही असे सांगितले असता त्याचा राग येऊन आरोपींनी माझ्या आईला लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यावेळी माझ्या आईच्या गळ्यातील दीड तोळ्याची पोत पलंगावरील आईचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल हा मारहाणीत कुठेतरी पडून गहाळ झाला. या दरम्यान, मी आईला सोडविण्यास गेले असता आरोपी सोमनाथ लोंढे व शिवाजी लुटे यांनी मला गजाने मारहाण केली. तसेच शिवाजी लोटे यांनी आम्हांला जातीवाचक शिवीगाळ केली व भैय्या व सोमनाथ मुंडे यांनी मला घराचे बाहेर ओढून माझ्या अंगावरील पंजाबी ड्रेस फाडला व मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. लाथ मारत आमच्या नादाला लागला तर तुम्हांला मारून टाकू अशी धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 485/2020 प्रमाणे भादंवि कलम 354,324, 452, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे करत आहेत.

Visits: 12 Today: 1 Total: 116676

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *