संगमनेर शहरासह पठारभागात अवकाळीमुळे दाणादाण रब्बीसह फळपिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वादळी वारे, ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह मुसळधार सुरू झालेल्या अवकाळी पावसाने संगमनेर शहरासह पठारभागातील द्राक्ष, आंबा, टरबूज, खरबूज, गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी शेतातील उभ्या पिकांना मोठा तडाखा दिला आहे. यामुळे आधीच दोन वर्षांपासून कोविड संकटाने बेजार असलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा झटका बसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

शुक्रवारी (ता.11) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संगमनेर शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने अनपेक्षितपणे मुसळधार जोरदार हजेरी लावली. त्यात वादळी वारे आणि जोरदार पाऊस आल्याने शेतातील सोंगून व काढणी केलेली पिके झाकून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. तर या पावसाने द्राक्ष, आंबा, चिकू फळबाग उत्पादकांची चिंता वाढली आहे. याचबरोबर काढणीला आलेला हरभरा, गहू, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच शहरात अचानक पाऊस कोसळू लागल्याने व्यापारी व नागरिकांची देखील चांगलीच धांदल उडाली. सुमारे तासभर हा पाऊस सुरू होता. यामुळे नाले वाहू लागले तर ठिकठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असल्याने चिखल तयार झाला होता. यातून नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागली.

सध्या गहू व कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकर्‍यांनी ही पिके काढून शेतात साठवून ठेवली आहे तर अनेक शेतकर्‍यांचे काढणीचे काम सुरू आहे. मात्र, अचानक आलेल्या अवकाळीने त्यांची तारांबळ उडाली. याचबरोबर सध्या आंब्याला चांगला बहर आलेला होता. परंतु, वादळी पावसाने तो गळून गेला आहे. त्यामुळे द्राक्ष, आंबा, चिकू आदी फळबाग शेतकरी मोठ्या चिंतेत दिसून येत आहेत. द्राक्ष व आंबा याची या हंगामातील सुरुवातच असून सुरुवातीलाच अवकाळीचे संकट या फळांवर आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होईल, मालाला योग्य ती चकाकी नसल्यास भाव सुद्धा गडगडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकर्‍यांनी काढून ठेवलेली पिके पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी. तसेच ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांनी संबंधित कंपनीला याबाबत कळवावे.
– प्रवीण गोसावी (तालुका कृषी अधिकारी, संगमनेर)

Visits: 139 Today: 2 Total: 1115795

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *