म्हाळुंगी पुलावरील सुशोभीकरण कुंड्यांची विकृतांकडून नासाडी विकृत प्रवृत्ती रोखण्यासाठी संगमनेरकरांनी आवाज उठविण्याची गरज
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वैभवशाली व सुसंस्कृत शहर म्हणून संगमनेर शहराची ओळख आहे. शहरात सातत्याने विकास कामे होत असून, काही प्रगतीपथावर आहेत. परंतु, म्हाळुंगी पुलाच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच झाले असून या पुलावरील सहा सुशोभीकरण कुंड्यांचे काही विकृत प्रवृत्तींकडून पुन्हा नासाडी करण्यात आली असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संगमनेर-अकोले महामार्गावर असलेल्या म्हाळुंगी पुलाच्या नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर व हरित संगमनेर ही संकल्पना राबविताना अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले जात आहे. तसेच विविध चौकाचौकांमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे. बाहेरून येणार्या प्रत्येक नागरिकाला संगमनेर हे अद्ययावत वैभवशाली वाटते. त्यासाठी संपूर्ण सुसंस्कृत संगमनेरकर सहकार्य करत असतात. मात्र काही विघातक प्रवृत्तींकडून सातत्याने चांगल्या कामाला गालबोट लावण्याचा प्रकार घडत असतो. शहरात अनेक ठिकाणी लावलेल्या झाडांना तोडण्याचे काम हे लोक करत आहे. तर कधी वाढत्या झाडांचे शेंडे खोडण्याचे काम करतात. दर्शनी भागामध्ये विद्रूपीकरण करणे असा त्यांचा सपाटा सुरू आहे.
याचबरोबर आता नव्याने म्हाळुंगी नदीवर उभारण्यात आलेल्या सहा सुशोभीकरण कुंड्यांची नासाडी केली आहे. यामुळे या विकृत प्रवृत्तींबदल संगमनेर शहरातून तीव्र संताप होत आहे. ही प्रवृत्ती वाढत असून ती वेळीच रोखली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक संगमनेरकराने पुढाकार घ्यावा आणि अशी व्यक्ती जर कुणाला आढळली तर तातडीने नगरपालिकेशी संपर्क करावा, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.