गुरुवारचा साईबाबांचा पालखी सोहळा पूर्ववत सुरू करा! ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोविड प्रकोप कमी झाल्याने दर गुरुवारी आयोजित केला जाणारा साईबाबांचा पालखी सोहळा व उत्सवकाळातील रथयात्रा पूर्ववत सुरू करावी, तसेच द्वारकामाई मंदिरात आतल्या बाजूने दर्शन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.9) साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांची भेट घेऊन केली.

या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, नितीन कोते, प्रमोद गोंदकर, ताराचंद कोते, गफ्फार पठाण, माजिद पठाण, दत्तात्रय कोते आदिंचा समावेश होता.

यावेळी या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की साईमंदिर परिसरात ठिकठिकाणी लावलेल्या लोखंडी जाळ्या हटवून अडथळे दूर करावेत. साईसमाधीच्या बाजूला लावण्यात आलेली काच तेथून हटवावी. भाविकांना साईसमाधीला स्पर्श करून दर्शन घेऊ द्यावे. साईमंदिरातील शांतता कायम राहील, तसेच कर्मचारी भाविकांसोबत सौजन्याने वागतील, याची काळजी घ्यावी. मंदिरातील सुरक्षा कर्मचार्यांच्या बदल्या कराव्यात. दर रविवारी व गुरुवारी गुरुपाठ पठणाची परंपरा आहे, मात्र कोविड प्रकोपात त्यात खंड पडल्याने ही परंपरा पुन्हा सुरू करावी.

दर गुरुवारी साईंचा पालखी सोहळा आयोजित केला जातो. साईबाबा हयात होते तेव्हापासूनची ही पंरपरा आहे. उत्सवातील रथयात्रा ही देखील जुनी परंपरा आहे. हे दोन्ही धार्मिक सोहळे पुन्हा सुरू व्हावेत, यासाठी साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांना भेटलो. त्यांनी मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.
– कमलाकर कोते, शिवसेना नेते
