दारुबंदी असलेल्या राजूरमध्येच होतेय अवैध दारुविक्री अकोले तालुका दारुबंदी चळवळीने दिला आंदोलनाचा इशारा


नायक वृत्तसेवा, अकोले
अवैध धंदे आणि दारुच्या व्यसनापायी गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सततच्या भांडणापायी ग्रामपंचायतने राजूरमधील (ता.अकोले) अवैध धंदे बंद करण्यासोबतच परिसरात दारुविक्री बंदचा ठराव केला. मात्र, पोलिसांच्या वरदहस्तामुळे गावात अवैध दारुविक्री सुरू असल्याने संतप्त झालेल्या अकोले तालुका दारुबंदी चळवळीने राजूर पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

राजूर येथील अवैध दारुविक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला. यासंदर्भात राजूर पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला. अकोले तालुका दारुबंदी चळवळीचे हेरंब कुलकर्णी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनही दिले. मात्र, तरी देखील पोलिस प्रशासनाकडून गावातील अवैध दारु धंदे बंद करण्यासाठी सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. येत्या आठवड्यापर्यंत संबंधित अवैध धंदे बंद न झाल्यास अकोले तालुका दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.

अनेकांचे संसार वाचविण्यासाठी गावातील अवैध धंद्यांसोबतच परवानाधारक दारुविक्री बंदीसाठी राजूर येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने 5 सप्टेंबर 2005 च्या विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारीत केला. या ठरावाची प्रत उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा पोलीस यंत्रणेला अनेकदा देण्यात आली आहे. मात्र, पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून अद्यापपर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याउलट गावातील अवैध व्यावसायिकांची पोलीस प्रशासनाकडून पाठराखण केली जात आहे. ही अवैध दारुविक्री थांबत नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना राजूरला भेट देण्याची विनंती केली आहे. तसेच दारु विक्रेत्यांवर झालेले दाखल गुन्हे एकत्र करून तडीपारीचे प्रस्ताव करावेत अशी मागणी केली आहे. जर येत्या आठ दिवसांत राजूरमधील अवैध दारुविक्री बंद झाली नाही तर 15 जानेवारीच्या दरम्यान राजूर पोलीस ठाण्यासमोर एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

Visits: 92 Today: 3 Total: 1098134

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *