वीज वितरण कंपनीच्या मग्रुरीचा सर्वसामान्यांना त्रास! बेमालुम छाटलेली झाडे भररस्त्यात; अधिकार्‍यांना मात्र सोयरसुतक नाही..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अत्यंत गचाळ कारभार आणि भ्रष्टाचार यामुळे सर्वसामान्यांना अत्यावश्यक असूनही नकोशा वाटणार्‍या वीज कंपनीची आता आणखी एक मग्रुरी समोर आली आहे. दरवर्षी ठराविक कालावधीत विद्युतवाहिन्यांना अडथळा ठरत असल्याचे कारण सांगून वीज कंपनी आडहत्यारी ठेकेदाराकडून शहरातील झाडांची बेसुमार आणि मनमानी छाटणी करते. ठेकेदारीतून मलाई लाटण्याच्या या प्रकारात पालिका आणि स्थानिकांच्या परिश्रमातून वाढलेली झाडे अविचाराने कशीही तोडली जातात. ढगांचा एखादा पूंजका आकाशी दिसताच छाटणीचे टेंडर मंजूर करणारी वीज कंपनी छाटलेल्या झाडांच्या फांद्या मात्र पालिकेच्या भरवशावर तशाच सोडते. या मग्रुरीतून वीज कंपनी विरुद्ध पालिका असा नवा वाद उभा राहीला असून शनिवारी छाटलेल्या झाडांच्या फांद्या आजही रस्त्यारस्त्यावर तशाच पडून आहेत. त्यामुळे अनेक भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वीज कंपनीच्या या मनमानीचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे. धक्कादायक म्हणजे वीज कंपनीच्या नवीन नगररोड कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगतच कंपनीच्या आवारातील झाडाच्या छाटलेल्या फांद्या अस्ताव्यस्त पडल्या आहेत. अधिकारी त्याला वळसा घालूनच कार्यालयात जा-ये करीत आहेत, मात्र त्यातील कोणत्याही अधिकार्‍याच्या डोळ्यांना सामान्यांना होणारा त्रास दिसला नाही. यावरुनही वीज कंपनीची मग्रुरी ठळकपणे दिसून येत असून नागरिकांमधील रोषाचे कारण ठरणारी आहे.


गेल्या काही दशकांमध्ये जागतिक तापमानवाढीच्या संकटाने गांभीर्य घेण्याइतपत वेग घेतल्याने त्यातून वृक्षारोपणाची चळवळ उभी राहण्याची गरज समोर आली. केंद्र व राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात कृतीआराखडे तयार करुन अगदी ग्रामपातळीपर्यंत झाडांचे महत्त्व पोहोचवून ‘हरित विश्‍वा’चे चित्रही उभे केले. त्यातून अनेक खासगी सामाजिक, सेवाभावी संस्था व व्यक्ति समोर आल्या व त्यांनी दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करुन त्यांच्या संगोपनासाठी प्रयत्न सुरु केले. संगमनेरातही या उपक्रमाला मोठे महत्व दिले गेल्याने गेल्याकाही वर्षात वृक्षारोपण आणि संवर्धन करणार्‍यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शहराच्या आसपासच्या ओसाड टेकड्या आणि परिसरात बघायला मिळत असताना शहरातही झाडांची संख्या शतपटीने वाढल्याचे सर्वश्रृत आहे.


संगमनेर शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते, उपनगरांमधील गल्ल्या, चौक यासह सार्वजनिक ठिकाणांवर पालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. मालपाणी उद्योग समूहाचाही या प्रयत्नात गेल्या कित्येक दशकांपासून सहभाग आहे. उद्योजक मनीष मालपाणी यांनी वन-ट्री सारख्या खांडगावच्या टेकडीसह धांदरफळ, सायखिंडी शिवारातील काही डोंगरांवर अक्षरशः जंगल फुलवले आहे. त्यांच्या पत्नी रचना दरवर्षी 50 ते 75 हजार रोपांचे विनामूल्य वाटप करुन वृक्षारोपणाच्या मोहीमेत ताकदीने कार्यरत आहेत. सर्वसामान्यांमध्येही जागृती निर्माण झाल्याने गावठाणासह आसपासच्या परिसरातील उपनगरांमध्ये हिरवाई वाढली आहे. पाच-सात वर्षांपूर्वी लावलेली छोटी रोपं आता 25/30 फुटाच्या उंचीला गेली आहेत.


मात्र त्यांची हिच उंची वीज वितरण कंपनीच्या डोळ्यात खूपत असून ‘अडथळ्या’च्या नावाखाली ठेकेदाराच्या माध्यमातून दरवर्षी डौलदार वाढण्याचा प्रयत्न करणार्‍या या झाडांवर कुर्‍हाड चालवली जात आहे. त्यातही घाईघाईत झाडे तोडावीत अशा पद्धतीने आडहत्यारी वाटणार्‍या ठेकेदाराकडून या झाडांची निर्दयीपणे छाटणी झाल्याने अनेक झाडांचे फक्त बुंधेच राहिले आहेत, अनेकांच्या सर्वच फांद्या छाटल्याने बोडख्या दिसणार्‍या झाडांच्या संख्येतही मोठी भर पडली आहे. पावसाळ्यापूर्वी दोन-चार महिने सलगपणे ही ‘टेंडर मोहीम’ दरवर्षी न विसरता राबवली जाते. मात्र आश्‍चर्य म्हणजे टेंडर भरणारा लाकूडतोड्या ठेकेदार फक्त तोडायचे काम करतो, परंतु त्याने कशाही तोडलेल्या फांद्या, झाडे मात्र अस्ताव्यस्त सोडून तो खुशाल निघून जातो. कंपनीच्या या मग्रुरीमुळे शनिवारी (ता.31) रहदारीच्या अनेक रस्त्यांवर तोडलेली ही झाडे आजही तशीच पडून आहेत. त्याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होत असून वाहतुकीचा वारंवार खोळंबाही होत आहे.


शहरातील अंतर्गत स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी पालिकेची असते. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या फांद्या उचलण्याची प्रथमदर्शनी जबाबदारी त्यांचीच आहे. मात्र वीज वितरण कंपनी दरवर्षी झाडे छाटण्याचे टेंडर काढून खासगी ठेकेदारामार्फत त्याची छाटणी करवून घेते. या प्रक्रियेत केवळ छाटणीच होत असल्याने तोडल्यानंतर रस्त्यावर पडणार्‍या फांद्याचे काय? याचे उत्तर वीज कंपनीकडे नाही. वास्तविक झाडे छाटणीची निविदा काढतानाच तोडलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावण्याची अट घातली पाहिजे किंवा कदाचित असेलही. मात्र त्यासाठी होणारा ठेकेदाराचा खर्च वाचला तर त्यातली निम्मी रक्कम गिळता येईल या विचारानेही वीज कंपनी अर्धवट कामं करुन उर्वरीत गोष्टी पालिकेच्या भरवशावर सोडत असल्याचा आरोपही आता सामान्यांमधून होत आहे.


बेकायदा कत्तलखान्यातील टाकावू अवयव गुपचूप ‘घंटागाडी’तून वाहुन नेत पालिकेच्या कंपोस्ट डेपोत त्याची विल्हेवाट लावण्याचा आणि त्यापोटी महिन्याकाठी मोठी कमाई करण्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी समोर आला होता. सध्याच्या वीज कंपनी व पालिका यांच्यातील वादातूनही असाच ‘वास’ येवू लागला असून पालिकेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना वीज कंपनीचा ठेकेदार काहीच देत नसल्याने त्यातूनच वारंवार असे प्रकार घडत असल्याचीही चर्चा आहे. त्यावरुन दोन्ही शासकीय संस्थांमधील ‘काहीजण’ मलिदा लाटण्याच्या संघर्षात सर्वसामान्यांची मात्र छळवणूक करीत होत असल्याने संगमनेरात रोष निर्माण होवू लागला आहे.

Visits: 357 Today: 2 Total: 1582841

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *