राजस्थानच्या युवकाची ‘झाडे लावा झाडे जगवा’ची मोहीम प्रबोधनासाठी तीन महिन्यांत 2400 किलोमीटरचा केला प्रवास
नायक वृत्तसेवा, नेवासा
सिरोही (राजस्थान) येथील बावीस वर्षीय युवकाने ‘झाडे लावा झाडे जगवा…’ या संकल्पाची खूणगाठ मनाशी बांधून काश्मीर ते कन्याकुमारी पायी दिंडी काढली आहे. तीन महिन्यांत 2400 किलोमीटर प्रवास व चार राज्यांची सीमा ओलांडून तो सोनईत आला. ग्रामस्थांनी या ध्येयवेड्या युवकाचे स्वागत केले.
शाळेत असताना शिक्षकाने पर्यावरणाचे महत्त्व सांगताना वृक्षसंवर्धनाबाबत केलेले मार्गदर्शन मनाला भावले आणि सिरोही (राजस्थान) शहरातील प्रदीप सजनलाल माली 2 डिसेंबर, 2021 रोजी श्रीनगर येथून पायी निघाले. जम्मू, पठाणकोट, हिस्सार, जयपूर, टोंक, उज्जैन, इंदूर, धुळे, मालेगाव, असा प्रवास करीत त्यांनी शनिशिंगणापूर गाठले. सध्या मुक्कामाच्या ठिकाणी ते वृक्षसंवर्धनाबाबत प्रबोधन करीत आहेत. सैन्यदलात भरती होऊन त्यांना देशसेवा करायची आहे.
रोज सकाळी आठ वाजता पाठीवर वृक्षसंवर्धनाचा फलक लावून ते पायी प्रवासास प्रारंभ करतात. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी प्रबोधन करतात. रोज 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास होतो. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या पुरातन मंदिरांना आवर्जून भेट देतात. सोनईतील हेमाडपंती महादेव मंदिरास भेट दिली असता, स्नेह फाउंडेशनचे सदस्य संजय गर्जे, आनंद भळगट, महावीर चोपडा, हृषीकेश जंगम, महेश मंडळाचे अक्षय म्हसे, ज्ञानेश भालेराव आदिंनी त्यांचा सन्मान केला.
पन्नासहून अधिक गावांत वृक्षारोपण..
प्रदीप माली यांनी मुक्कामाच्या ठिकाणी प्रबोधन केल्याने जालावाड, कोटा, सोनपूर, धुळ्यासह पन्नासहून अधिक गावांत वृक्षारोपण करण्यात आले. अनेक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.