देशाच्या विकासात महिलांची भूमिका महत्वाची ः तांबे थोरात महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आधुनिक काळात जग वेगाने पुढे जात असून त्यामध्ये महिलांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत संगमनेर शहराच्या प्रथम नागरिक दुर्गा तांबे यांनी व्यक्त केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. गोरक्षनाथ थोरात आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, प्रत्येक स्री ही आपल्या दैनंदिन कामातूनच आपली जबादारी सक्षमपणे सांभाळत असते. मात्र तिला समाजात मानसन्मान कमी प्रमाणात मिळत असतो. तरी सुद्धा ती कोणतीही तक्रार न करता आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असते. महिलांनी आपली नोकरी, दैनंदिन कामे पार पाडत असताना स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. रजिस्ट्रार बाबुराव गवांदे म्हणाले, देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, कल्पना चावला या महिलांनी देखील आपल्या कर्तृत्वाने आपल्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तसेच अलीकडील काळातही महिलांचा विकास अधिक होताना दिसून येतो हे महिलांच्या सबलीकरणाचे आणि सक्षमीकरणाचे यश म्हणावे लागेल. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये स्रीयांची भूमिका महत्वाची आहे. कारण त्यांच्याशिवाय देशाचा विकास अशक्य असल्याने त्यांना विकासाच्या प्रवाहात आणून देशाचा अधिक जलद गतीने विकास साधता येईल, असे प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सोनल वाळे यांनी केले. आभार डॉ. विलास कोल्हे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 185 Today: 1 Total: 2057427

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *