समशेरपूर गटातील विकासकामांत भ्रष्टाचार ः तळपाडे गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचाही दिला इशारा

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील समशेरपूर गटातील अनेक गावांमध्ये विकासकामांत भ्रष्टाचार झाला आहे. जिल्हा परिषद सदस्या पतीने दादागिरी करून शासकीय अधिकार्यांना हाताशी धरत भ्रष्टाचार केला आहे. याबाबत चौकशी अहवालातही ठपका ठेवला असून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा. अन्यथा शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा शिवसेनेचे नेते मधुकर तळपाडे यांनी दिला.

अकोले शासकीय विश्रामगृहात तालुका शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी तेे बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामहरी तिकांडे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, माधव तिटमे, महेश नवले, नितीन नाईकवाडी, भाऊसाहेब गोर्डे, बाळासाहेब कुमकर, नंदकुमार वाकचौरे, प्रमोद मंडलिक, नवनाथ शेटे, शिवाजी शेटे, महेश देशमुख, रावसाहेब वाकचौरे, राम सहाणे, मधुकर दराडे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना तळपाडे म्हणाले, समशेरपूर जिल्हा परिषद गटातील समशेरपूर, सांगवी, म्हाळुंगी, मान्हेरे या गावांत दोन ते अडीच कोटींचा गैरव्यवहार करणारा भुजंग कोण आहे. समशेरपूर ग्रामपंचायतमध्ये 14 वा वित्त आयोगाच्या निधीची नियमाप्रमाणे अंमलबजावणी न करता ग्रामसभेला विश्वासात न घेता सांस्कृतिक भवन कामाची बेकायदेशीर निवड करून भाग 1, 2, व 3 असे 1 कोटी 20 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषद पदाधिकार्याच्या दबावाखाली मर्जीतल्या ठेकेदाराला देऊन बेकायदेशीर कार्यारंभ आदेश दिल्याचे चौकशी समितीच्या अहवालात उघड झाले आहे. एम. बी. पुस्तकात शाखा अभियंता व उपअभियंता यांची स्वाक्षरी नसताना ठेकेदाराला 93 हजार रुपये कसलीही कपात न करता दिले. जिल्हा परिषद सेस 202.21 अंतर्गत 3 लाख रक्कमेचे चार रस्ते एकूण 12 लाखांची कामे छातूरमातूर करून आदिवासी महिला सरपंच अनिता खडसे यांची फसवणूक करून 9 लाख 34 हजार वर्ग करून खोटे मूल्याकंन केले, असे समशेरपूरच्या कामातच 95 लाख 67 हजार 40 रुपयांचा अपहार झाल्याचे डोके समितीच्या अहवालात सिद्ध झाले आहे.

सांगवी येथील आदिवासी किमान गरजा अंतर्गत सांगवी ते पठार रस्ता मजबुतीकरण करणे हे 15 लक्षाचे काम 20 टक्के देखील न करता अधिकार्यांनी बोगस रेकॉर्ड करून झालेल्या कामाची दोनदा निविदा केली. सदर भुजंगाने निकटवर्तीय ठेकेदाराला हे काम देऊन अधिकार्यांशी हातमिळवणी करून 15 लाख रुपयांचा अपहार केला आहे. 17 लाख रुपयांचे सांगवी स्मशानभूमीचे कामही अर्धवट केले आहे. म्हाळुंगी येथील पेढेवाडी ते म्हाळुंगी रस्ता मजबुतीकरण 14 लाख 75 हजार रुपयांचे कामही अत्यंत निकृष्ट केले आहे. मान्हेरे येथील मान्हेरे ते कळसूबाईवाडी रस्ता मजबुतीकरण व पाईप मोर्या टाकणे हे काम कार्यकारी अभियंतांच्या स्वाक्षरीने मंजूर असतानाही कार्यारंभाचा आदेश ग्रामपंचायत सरपंचांना देण्यात आला नाही. तसेच वारंघुशी ते कळसूबाईवाडी रस्ता मजबुतीकरण काम अर्धवट आहे. या कामाचे खोटे रेकॉर्ड करून निधी वर्ग केला. या कामास पेसा निधीतून पुन्हा 5 लाखांची प्रशासकीय तरतूद केली. आदिवासी भागातील पेसा ग्रामपंचायतचे अज्ञानी ग्रामसेवक व सरपंच यांना ब्लॅकमेल करून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना अनेक गैरव्यवहारात गुंतविले आहे. ज्या बाजीराव दराडेंना तत्कालीन राष्ट्रवादीने सोडले तेव्हा आम्ही शिवसेनेत घेऊन उमेदवारी देऊन निवडून आणले. निवडून आल्यानंतर लगेच त्यांनी रंग बदलला, कायम दादागिरी गुंडगिरीची भाषा त्यांची आहे. त्यांनी अधिकारी, कर्मचारी व समशेरपूर गटात दमदाटी दहशत करून विकासकामात कोट्यवधी रुपयांचा गफला केला आहे. आता चौकशीतही सिद्ध होणार असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा शिवसेना आंदोलन उभारेल, असा इशारा तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी दिला आहे.
