कोविडच्या बाबतीत अहमदनगर पाठोपाठ संगमनेर ठरला अव्वल तालुका! दीड वर्षात एकतीस हजार रुग्ण; नगरच्या लष्करी रुग्णालयात एकाही मृत्यूही नोंद नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षी मार्चमध्ये जिल्ह्यात पाऊल ठेवणार्‍या कोविडने टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यालाच आपल्या कवेत घेतले आणि गेल्यावर्षी मार्च ते चालू वर्षीच्या ऑगस्टपर्यंत तब्बल 3 लाख 13 हजार 927 जणांना बाधित केले. या कालावधीत जिल्ह्यातील चौदा तालुक्यांसह अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 6 हजार 238 नागरिकांचा बळीही गेला. गेल्या सतरा महिन्यांच्या कोविड कालावधीत जिल्ह्यात सर्वाधीक 56 हजार 942 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातून आढळले तर त्या खालोखाल पाच लाख लोकसंख्येच्या संगमनेर तालुक्यातून तब्बल 30 हजार 814 रुग्ण समोर आले. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात बहुतेक तालुक्यातील संक्रमण आटोक्यात येत असतांनाही संगमनेर तालुक्याची स्थिती मात्र चिंताजनक असून दररोजची रुग्णवाढ धक्कादायक आहे.

जामखेड, लासलगाव अशा वेगवेगळ्या कनेक्शनच्या चर्चेतून मागील वर्षी मार्चमध्ये कोविड संक्रमणाने जिल्ह्यात चंचू प्रवेश केला आणि बघताबघता अल्पावधीतच संपूर्ण जिल्हा त्याच्या सावटाखाली आला. पहिल्या संक्रमणाच्यावेळी राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊनसह कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने मोठा काळ वाढणार्‍या संक्रमणाला एका मर्यादेपर्यंत ठेवण्यात जिल्हा यंत्रणांना यश मिळाले. त्यातूनही सावरत असतांनाच गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या विविध सणांनी जिल्ह्याची परिस्थिती पुन्हा बिघडवली आणि त्याचे परिणाम सप्टेंबरमध्ये पहायला मिळाले.

त्यातूनही जिल्हा बाहेर पडला, मात्र चालू वर्षात सर्वसामान्य नागरिकांसह शासन आणि प्रशासनेही हलगर्जीपणाचे पदोपदी दर्शन घडविल्याने जिल्ह्याला कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागला. यावर्षी मार्चपासून जिल्ह्यातील रुग्णगती वाढूनही प्रशासनाने त्यावर वेळीच आवर घालण्यात विलंब केल्याने त्याचा सर्वाधीक फटका एप्रिल व मे या दोन महिन्यात बसून या कालावधीत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून 2 लाखावर रुग्ण समोर येण्यासह हजारांवर रुग्णांचे बळी गेले. दुसर्‍या संक्रमणाच्या कालावधीत संपूर्ण देशात कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचे हालही झाले. मात्र तरीही त्यातून कोणताही बोध घेतला गेला नाही.

केंद्र व राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात येणार्‍या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचेही दुसर्‍या संक्रमणाच्या सुरुवातीला आणि ते संपल्यानंतर आजही बघायला मिळत आहे. त्यातही संगमनेरसह जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यातील स्थितीही याप्रमाणेच असल्याने अर्धा जिल्हा नियंत्रणात तर अर्धा अनियंत्रित असल्याचे विरोधाभाशी चित्रही सध्या दिसत आहे. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या कोविडने 3 लाख 13 हजार 927 जणांना बाधित केले. त्यातून 3 लाख एक हजार 271 जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले, तर दुर्दैवाने जिल्ह्यातील 6 हजार 238 नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला. सध्या जिल्ह्यातील 5 हजार 518 जणांवर उपचारही सुरु आहेत.

गेल्या सतरा महिन्यातील जिल्ह्यातील कोविड स्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला असता संक्रमणाचा सर्वाधिक फटका अहमदनगर महापालिका क्षेत्राला बसला. या क्षेत्रातील 56 हजार 942 नागरिक या कालावधीत बाधित झाले, त्यातील 55 हजार 232 जणांवर उपचार पूर्ण करण्यात आले, 1 हजार 514 जणांचा मृत्यू झाला तर सध्या 196 जणांवर उपचार सुरु आहेत. त्या खालोखाल संगमनेर तालुक्यातून तब्बल 30 हजार 814 रुग्ण समोर आले. त्यातील 29 हजार 292 रुग्णांवर उपचार झाले तर 422 जणांचा कोविडने बळी घेतला. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील सर्वाधिक सक्रीय रुग्ण संगमनेरात असून तब्बल अकराशे जणांवर उपचार सुरु आहेत. या कालावधीत अहमदनगर तालुक्यातूनही 23 हजार 639 रुग्ण समोर येवून त्यातील 22 हजार 662 रुग्णांवर उपचार पूर्ण करण्यात आले तर 641 जणांचा बळी गेला.

दुसर्‍या संक्रमणात आघाडीवर असलेल्या राहाता तालुक्यात आजवर 22 हजार 784 रुग्ण आढळले, त्यातील 22 हजार 47 रुग्णांनी उपचार घेवून घर गाठले तर 452 जणांचा जीव गेला. पारनेर तालुक्यातील 20 हजार 959 जणांना बाधा झाली, 19 हजार 997 रुग्ण बरे झाले व 370 जणांचा मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यात 17 हजार 761 रुग्ण आढळले, 17 हजार 184 रुग्णांवर उपचार करण्यात आले तर 261 जणांचा मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातून 17 हजार 24 रुग्ण समोर आले. 16 हजार 50 जणांवर उपचार पूर्ण करण्यात येवून 408 जणांना मात्र आपला जीव गमवावा लागला.

श्रीरामपूर तालुक्यात 19 हजार 986 रुग्ण आढळले, 15 हजार 610 रुग्णांवर उपचार करण्यात आले व 344 नागरिकांनी आपला जीव गमावला. अकोले तालुक्यातूनही 16 हजार 516 रुग्ण समोर येवून 15 हजार 799 जणांवर उपचार करण्यात आले. अकोल्यातील 160 जणांचा आत्तापर्यंत बळी गेला. शेवगाव तालुक्यातील 16 हजार 382 जणांना संक्रमण झाले, 15 हजार 845 जणांनी उपचार पूर्ण केले तर 243 जणांचे जीव गेले. राहुरी तालुक्यातील 16 हजार 294 जण बाधित झाले, 15 हजार 649 जणांनी उपचार पूर्ण केले व 396 जणांचा बळी गेला. नेवासा तालुक्यातील 15 हजार 975 जणांना संक्रमण होवून 15 हजार 374 जणांनी उपचार पूर्ण केले, 317 जणांचा बळी गेला. कर्जत तालुक्यातील 15 हजार 42 जण संक्रमित झाले, 14 हजार 842 जणांनी उपचार घेतले व 236 बळी गेला.

कोपरगाव तालुक्यातील 15 हजार 211 जणांना कोविडची लागण झाली, 14 हजार 864 जणांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले व 206 जणांचा जीव गेला तर जामखेड तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात कमी 11 हजार 220 जणांना कोविडची लागण झाली व त्यातील 10 हजार 824 जणांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. या कालावधीत जामखेड तालुक्यातील 268 जणांचा संक्रमणातून बळीही गेला. याशिवाय अन्य जिल्ह्यातील 4 हजार 407 जणांचे अहवालही संक्रमित आले, त्यातील 4 हजार 147 जणांनी उपचार पूर्ण केले तर 203 जणांचा बळी गेला. भिंगार लष्करी परिसर आणि लष्करी रुग्णालयातून 5 हजार 17 रुग्ण समोर येवून 4 हजार 914 जणांवर उपचार पूर्ण करण्यात आले. या कालावधीत भिंगार लष्करी परिसरातील 12 जणांचा बळी गेला. इतर राज्यातील 146 जणांचे अहवालही या कालावधीत पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. त्यातून 144 जणांनी एपचार घेवून घर गाठले, एकाचा मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरु आहे. कोविड संक्रमणाच्या गेल्या सतरा महिन्यांच्या कालावधीत लष्करी परिसरासह जिल्ह्यात 3 लाख 23 हजार 497 रुग्ण आढळले, 3 लाख 11 हजार 376 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले, 6 हजार 533 जणांचा बळी गेला तर 5 हजार 588 जणांवर आजही उपचार सुरुच आहेत.


जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी भारतीय लष्कराची तोफखाना रेजिमेंट असून मोठ्या प्रमाणात सैन्याचा वावरही आहे. कोविड संक्रमणाच्या कालावधीत बाधित झालेल्या 967 लष्करी जवानांवर लष्कराच्याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे या संपूर्ण कालावधीत लष्करी रुग्णालयात दाखल झालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 967 रुग्णांवर लष्कराच्या वैद्यकीय पथकाने उपचार करुन त्या सर्वांना स्वस्थ केले. अहमदनगर जिल्ह्यातील कोविडवर उपचार करणार्‍या सर्व रुग्णालयांमध्ये लष्कराचे एकमेव रुग्णालय असे आहे ज्याठिकाणी उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Visits: 123 Today: 2 Total: 1101043

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *