भंडारदरा पाणलोटातील घाटघरमध्ये ‘चौदा’ इंच पाऊस! महिनाअखेर धरण भरणार; भीज पावसाने लाभक्षेत्रही झाले चिंब..

नायक वृत्तसेवा, राजूर
मागील 48 तासांपासून अकोले तालुक्यात सर्वदूर तुफान पाऊस सुरु असून मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघरमध्ये तब्बल 14 इंच तर रतनवाडीत 13 इंच पाऊस झाला असून चालू हंगामात पावसाने नवा विक्रम नोंदवला आहे. सततच्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवकही ताशी 52 दशलक्ष घनफूटांवर गेली असून आज सकाळी धरणाचा पाणीसाठा 75 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुळा खोर्‍यातही सर्वदूर पावसाचे धुमशान सुरु असून लहितजवळील मुळा नदीपात्रातून तब्बल 30 हजार क्यूसेकचा विसर्ग सुरु आहे. पाणलोटासह जिल्ह्यातही सर्वदूर भीज पाऊस सुरु असल्याने बळीराजाच्या चेहर्‍यावर समाधान दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी नाशिकसह जायकवाडी धरणाच्या पाणलोटात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा असल्याने समन्यायी पाणीवाटपाचे संकटही गडद होवू लागले आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रालाच प्रदीर्घ हुलकावणी देणार्‍या मान्सूनने गेल्या 48 तासांतच मुळा, भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणांचे चित्र पालटले आहे. समाधानकारक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत कोरड्याठाक असलेल्या भोजापूर जलाशयातही सात दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाल्याने संगमनेर व सिन्नर तालुक्यातील लाभ क्षेत्रात आनंद निर्माण झाला आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या पूर्वार्धात पाणलोट क्षेत्रात जोरदार पुनरागमन करणार्‍या पावसाने पूर्व भाद्रपदा नक्षत्रात रौद्ररुप धारण केले असून बुधवारी सकाळी सहा ते आज (गुरुवार) सकाळी 6 वाजेपर्यंतच्या अवघ्या 24 तासांतच भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघरमध्ये हंगामातील सर्वाधीक 345 मिलीमीटर (14 इंच), रतनवाडीत 326 मिलीमीटर (13 इंच) तर, पांजर्‍यात 315 मिलीमीटर (साडेबारा इंच) इतका विक्रमी पाऊस कोसळला आहे.


गेल्या 48 तासांपासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण पाणलोटात प्रचंड गारवा निर्माण झाला असून आदिवासी बांधवांना दुभती जनावरं घरात बांधावी लागत आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरुन कोसळणार्‍या जलप्रपातांनीही विक्राळ रुप धारण केल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पाणी वाहत असून आदिवासी पाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या भंडारदरा धरणाच्या जलाशयात तशी 52 दशलक्ष घनफूट वेगाने पाण्याची आवक सुरु असून 24 तासांत धरणात तब्बल 1 हजार 235 दशलक्ष घनफूट (सव्वा टीएमसी) पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा आज सकाळी सहा वाजता 8 हजार 221 दशलक्ष घनफूटावर (74.47 टक्के) पोहोचला असून पावसाने सातत्य राखल्यास महिन्या अखेरपर्यंतच भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


अकोले, संगमनेरसह उत्तर नगरजिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील दुष्काळी जमिनी ओलाताखाली आणणार्‍या निळवंडे धरणाच्या पाणलोटातही पूर्व भाद्रपदा नक्षत्राची जादू विखुरली असून कृष्णवंतीचा ऊगम असलेल्या कळसूबाईच्या शिखरांवर बुधवारपासून तुफान जलधारा कोसळत आहेत. त्यामुळे प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णवंतीला मोठा पूर आला असून या नदीवर वाकीजवळ बांधण्यात आलेल्या जलाशयाच्या भिंतीवरुन तब्बल 2 हजार 199 क्यूसेक वेगाने पाणी वाहत आहे. कृष्णवंतीचा प्रवाह वाढल्याने रंधा धबधबाही आवेशाने कोसळू लागला असून भरपावसात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात निळवंडे धरणात ताशी 26 दशलक्ष घनफूटाच्या गतीने 632 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले असून पाणीसाठाही आता 2 हजार 953 दशलक्ष घनफूट (35.46 टक्के) इतका झाला आहे.


मुळा धरणाच्या पाणलोटातील सर्वाधीक पावसाचा परिसर समजल्या जाणार्‍या हरिश्‍चंद्रगडाच्या डोंगररांगांवर पावसाने रौद्ररुप धारण केले असून मुळा खोर्‍यातील सर्व लहान-मोठे पाटबंधारे प्रकल्प यापूर्वीच ओसंडल्याने मुळा नदीला मोठा पूर आला आहे. अतिशय विस्तीर्ण असलेल्या या पाणलोटातील ओढ्या-नाल्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले असून सर्वत्र पाणीच पाणी नजरेस पडत आहे. बुधवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे सायंकाळी सहा वाजता लहितजवळील मुळापात्रातील पाण्याचा फुगवटा 25 हजार क्यूसेकच्या पुढे गेला होता, रात्रभर झालेल्या पावसाने त्यात आणखी भर पडली असून आज सकाळी 6 वाजता मुळापात्रातून तब्बल 29 हजार 533 क्यूसेक इतक्या प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. त्यामुळे या धरणात सध्या ताशी 53 दशलक्ष घनफूट या वेगाने अवघ्या 24 तासांतच 1 हजार 279 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले असून धरणाचा एकूण पाणीसाठा 11 हजार 915 दशलक्ष घनफूट (45.83 टक्के) झाला आहे.


जिल्ह्यातील या तिनही मोठ्या धरणांसह संगमनेर व अकोले तालुक्यातील जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या आढळा खोर्‍यातूनही अतिशय दिलासादायक वृत्त समोर आले असून पाडोशी व सांगवी ही दोन्ही पाटबंधारे प्रकल्प ओसंडल्याने आढळा धरणातील पाणीसाठा वेगाने पुढे सरकू लागला आहे. गेल्या 24 तासांत या धरणाच्या पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात 65 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून त्यातील 55 दशलक्ष घनफूट पाणी काल सायंकाळी सहा ते आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या 12 तासांत जमा झाले आहे. त्यामुळे या धरणाचा एकूण पाणीसाठा आता 623 दशलक्ष घनफूटावर (58.77 टक्के) पोहोचला आहे. संगमनेर व सिन्नर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी वरदान असलेल्या भोजापूर धरणाची अवस्थाही गेल्या चोवीस तासांत बदलली असून एव्हाना कोरड्याठाक असलेल्या या धरणात पहिल्यांदाच सात दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने लाभ क्षेत्रात आनंद निर्माण झाला आहे. एकंदरीत गेल्या 48 तासांपासून अकोले तालुक्याच्या घाटमाथ्यासह सर्वदूर जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणांमधील पाण्याची आवक वाढली असून धरणसाठे वेगाने पुढे सरकत असल्याने उत्तर नगरजिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


गेल्या 24 तासांत झालेला पाऊस –
घाटघर – 345 मि.मी.
रतनवाडी – 326 मि.मी.
पांजरे – 315 मि.मी.
भंडारदरा – 180 मि.मी.
निळवंडे – 89 मि.मी.
मुळा (धरण) – 18 मि.मी.
आढळा – 16 मि.मी.
कोतुळ – 47 मि.मी.
अकोले – 84 मि.मी.
संगमनेर – 34 मि.मी.


उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले 11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेचे भंडारदरा धरण 15 ऑगस्टपूर्वीच भरते असा अनेकदा प्रसंग आला आहे. मात्र यावेळी पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने मोठी चिंता निर्माण झाली होती. अशा स्थितीत गेल्या 48 तासांत जोरदार बरसणार्‍या पावसाने बळीराजाची चिंताही हटवली असून पुढील चार दिवस पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास हे धरण जुलैतच पूर्ण क्षमतेने ओसंडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 76 Today: 2 Total: 147796

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *