कत्तलखाने सुरुच असल्याचे उपअधीक्षकांच्या कारवाईवरुन स्पष्ट! कारमधून चारशे किलो गोवंशाचे मांस जप्त; मदिनानगरमधील कसायासह तिघांवर गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलिसांच्या मुखी कथीत बंद असलेले गोवंश कत्तलखाने नागरीकांच्या डोळ्यात धुळ झोकून सुरुच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याबाबत दैनिक नायकने शनिवारच्या अंकात खेड (जि.पुणे) व गंगापूर (जि.औरंगाबाद) येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वृत्त प्रसिद्ध करुन संगमनेर पोलिसांचा ‘तो’ दावा फोल ठरवला होता, त्यानंतर अवघ्या चोवीस तासांतच संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने सायखिंडी फाट्यावर सापळा लावून एका कारमधून मुंबईच्या दिशेने निघालेले चारशे किलो गोवंशाचे मांस पकडून दैनिक नायकच्या वृत्तावर सत्याची मोहर उमटवली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन वाहनचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून मुख्य कसाई मात्र पसार झाला आहे.


याबाबत उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई रविवारी (ता.15) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर सायखिंडी फाट्यावर करण्यात आली. याबाबतची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना समजली होती. त्यानुसार त्याची खातरजमा करुन त्यांनी आपल्या पथकाला आवश्यक त्या सूचना देत पुणे-नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेला सापळा लावण्याचे व कारवाई करण्याचे आदेश बजावले. त्यानुसार त्यांच्या पथकातील पो.ना.अण्णासाहेब दातीर, पो.कॉ.अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांच्या पथकाने सायखिंडी फाट्यावरील रस्ता गतिरोधकाजवळ सापळा रचला.


बराचवेळ या ठिकाणी संशयीत वाहनाची वाट पाहिल्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या वर्णनानुसारचे वाहन संगमनेरकडून नाशिकच्या दिशेने येत असल्याचे पोलीस पथकाला दिसले. यावेळी पथकाने आपल्याकडील खासगी वाहन सुरु करुन पाठलाग करण्याची तयारी करीत समोर येवून धडकलेल्या ‘त्या’ संशयीत कारला थांबण्याचा इशारा केला, पोलिसांची संख्या आणि पळून गेल्यास पाठलाग करण्याची तयारी बघून सदर कारच्या चालकाने कोणताही आडावेडा न घेता आपले वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले. यावेळी पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात पाठीमागील बाजूस काळ्यारंगाच्या प्लॅस्टिक कागदामध्ये गुंडाळालेले सुमारे चारशे किलो वजनाचे गोवंशाचे मांस आढळून आले.


यानंतर पोलीस पथकाने दोघांनाही ताब्यात घेत वाहनासह शहर पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांची चौकशी केली असता वाहनचालकाने आपले नाव साद खालीद शेख (वय 19, रा.भारतनगर) व त्याच्या साथीदाराचे नाव ऋषिकेश मच्छिंद्र भोसले (वय 19, रा.मोगलपूरा) असे असल्याचे सांगितले. सदरचे गोवंशाचे मांस कोणाच्या मालकीचे आहे याबाबत विचारणा करता त्यांनी मदिनानगर येथील अजमद लतीफ कुरेशी यांच्या मालकीचे असून त्याच्याच सांगण्यावरुन त्याच्या वाड्यातून सदरचे गोवंशाचे मांस वाहनात भरुन ते मुंबईकडे घेवून जात असल्याची कबुली त्यांनी दिली.


या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने 80 हजार रुपये किंमतीचे 400 किलो गोवंशाचे मांस आणि एक लाख रुपये मूल्य असलेली रिट्स कार (क्र.एम.एच.02/बी.झेड.1364) जप्त केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील कंपनी चालक सचिन उगले यांच्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरोधात भा.द.वी.कलम 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम 5 (क), 9 (अ) नुसार गुन्हा दाखल करुन वाहनचालक शेख याच्यासह त्याचा जोडीदार भोसले या दोघांना अटक केली असून कत्तलखान्याचा चालक अजमद कुरेशी मात्र पसार झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ना.विजय खाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.


गेल्यावर्षी संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांनी छापा घालून राज्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर राज्यभर इभ्रत गेलेल्या संगमनेर पोलिसांनी यापुढे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित एकही गोवंशाचा कत्तलखाना सुरु होवू देणार नाही अशी जोरदार वल्गनाही केली होती. त्यानंतरच्या काही कालावधीसाठी पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवण्यासह तपासणी नाकाही सुरु केला. अर्थात महिन्याभरात या सगळ्या गोष्टी बंद झाल्या तेव्हाच स्थानिक पोलिसांची येथील कत्तलखान्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट झाली होती.


त्यानंतर नारायणगाव, जुन्नर या पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांसह औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पोलीस कारवायातून संगमनेरातील कत्तलखाने केवळ अभासी पद्धतीने बंद असल्याचे उघड झाले. याबाबत दैनिक नायकने आपल्या शनिवारच्या (ता.14) अंकात पोलिसांची पोलखोल करणार्‍या दोन कारवायांबाबतचे वृत्त प्रसिद्ध करुन कत्तलखाने बंद असल्याचा संगमनेर पोलिसांचा दावा फोल ठरविला होता. त्यानंतरच्या अवघ्या चोवीस तासांतच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने संगमनेरातच कारवाई करीत दैनिक नायकच्या त्या दाव्यावर सत्यतेची मोहोरच उमटवली आहे.


संगमनेरातील बेकायदा गोवंशाचे कत्तलखाने राज्यात बदनाम आहेत. सहा महिन्यांपूर्वी याच साखळी कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांचा छापा पडला होता. राज्यातील सर्वात मोठी कारवाई ठरलेल्या या छाप्यातून कत्तलखान्यांचे अर्थकारण आणि त्यासाठी त्यांना साहाय्य करणार्‍या आश्रयदात्यांची इत्यंभूत माहिती असलेल्या अनेक डायर्‍याही छापा पथकाच्या हाती लागल्या. या डायर्‍यांमध्ये हप्तेखोरीच्या कुंडल्या असूनही कोणावरही ठपका ठेवण्यात आला नाही हे विशेष. राज्यात खळबळ माजवणार्‍या या कारवाईने संगमनेर पोलिसांची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेली, मात्र त्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे रविवारच्या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *