शेवगाव बस आगार बुधवारी मध्यरात्रीपासून बंद बस अपघाताचा गुन्हा दाखल न केल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, शेवगाव
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. मात्र, काही कर्मचारी कामावर येऊन बहुतांश आगारामधून गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, शेवगाव येथील एसटी डेपो बुधवारी (ता.2) मध्यरात्रीपासून कामगारांनी पुन्हा बंद केला आहे. या मागे संपाचे नव्हे तर एका अपघाताचे कारण आहे.

शेवगाव आगारातील एका एसटी बसला अपघात झाला, त्याची तक्रार शेवगाव पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याचा आरोप करीत कर्मचार्‍यांनी डेपोचे कामकाज बंद केले. जोपर्यंत गुन्हा दाखल करून घेतला जाणार नाही, तोपर्यंत डेपो शंभर टक्के बंद ठेवला जाईल, अशी भूमिका कामगार नेत्यांनी घेतली आहे. एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी दिलीप लबडे यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यानुसार शेवगाव डेपोची शेवगाव-गेवराई ही बस चापडगावमध्ये आरोग्य केंद्राजवळ प्रवाशी उतरवण्यासाठी थांबली होती. त्यावेळी चुकीच्या बाजूने ओहरटेक करणार्‍या दोन ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरचा धक्का बसला लागला. ट्रॉलीला हेलकावा बसून एसटी बसच्या डाव्या बाजूचा आरसा फुटला. सोबतच बसचेही नुकसान झाले. त्यामुळे एसटीच्या चालकाने शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित ट्रॅक्टर चालकांवर अपघाताचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मात्र शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल केला नाही. याची माहिती डेपोत कळाली. त्यामुळे याच्या निषेधार्थ डेपोचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांच्या निषेधार्थ शेवगाव डेपोच्या चालक-वाहकांनी मध्यरात्रीपासून एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही लबडे यांनी सांगितले. सदर अपघाताला कारण ठरणारा हा ट्रॅक्टर हा शेवगाव तालुक्यातील एका राजकीय पदाधिकार्‍याच्या नातेवाईकाचा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय दबावातूनच पोलिस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा एसटी कर्मचार्‍यांचा आरोप आहे. संप सुरु असताना, बस बंद ठेवण्यासाठी दबाव असताना आम्ही शेवगाव आगारातील वाहक-चालक जीव धोक्यात घालून बससेवा सुरू केली आहे. यासाठी पोलीस संरक्षण दिले जाईल, असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासही पोलसी टाळाटाळ करीत आहेत. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. जोपर्यंत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शेवगाव डेपो शंभर टक्के बंद ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Visits: 13 Today: 1 Total: 115351

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *