यूटेकच्या दारात शेतकर्यांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न उसाचे पेमेंट थकवल्याने शेतकरी संतप्त; प्रशासनाची उडाली धावपळ

नायक वृत्तसेवा, नेवासा
संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील यूटेक शुगर या खासगी कारखान्याने पेमेंट थकवल्याने नेवासा तालुक्यातील शेतकर्यांनी कारखान्याच्या सरव्यवस्थापक कार्यालयाच्या दारात रविवारी (ता.8) दुपारी 2 वाजेच्या सुमारास पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे कारखाना प्रशासनाची एकच धावपळ उडाली असल्याचे पहायला मिळाले.

नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी, कुकाणा, जेऊर, वरखेड व परिसरातील तसेच तालुक्यातील शेतकर्यांचे चालू गळीत हंगामातील उसाचे पेमेंट संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील यूटेक शुगर या खासगी साखर कारखान्याने थकवल्याने शेतकर्यांनी रविवारी (ता.8) दुपारी 2 वाजेच्या सुमारास आंदोलनाचा पवित्रा घेत कारखान्याचे सरव्यवस्थापक बी. एन. पवार यांना चांगलेच खडसावत पेमेंटबाबत धारेवर धरले.

मात्र कारखाना व्यवस्थापनाने ठोस उत्तर दिले नसल्याने भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डीले, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शंकर लिपणे, नवनाथ म्हसरूप यांनी कारखाना कार्यालयाच्या दारातच पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे गरबडलेल्या व्यवस्थापनाने सोमवारी (ता.9) सकाळीच पेमेंट जमा करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी व व्यवस्थापनाचा वाद निवळला.
