डॉ.पूनम निघुते यांचे शवविच्छेदन ‘घाटी’ रुग्णालयात! नातेवाईकांना घातपाताचा संशय; माहेरीच अंत्यसंस्कार होण्याची शक्यता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील निष्णात व तरुण महिला डॉक्टर पूनम योगेश निघुते यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशय अद्यापही कायम आहे. अतिशय शांत, संयमी आणि सुस्वभावी असलेल्या डॉ.पूनम निघुते इतके टोकाचे पाऊल उचलतील यावर संगमनेरातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांसह त्यांच्या नातेवाईकांनाही विश्वास बसत नसल्याने त्यांनी मयत डॉ.पूनम यांचे शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संगमनेर पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथे नेण्यात आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संगमनेरातील डॉ.योगेश निघुते बालरोग तज्ज्ञ म्हणून परिचयाचे आहेत. नवीन नगर रस्त्यावरील ताजणे मळा परिसरात त्यांचे चिरायु रुग्णालय असून रुग्णालयाच्या वरचे मजल्यावरच निघुते डॉक्टर दाम्पत्य वास्तव्यास आहे. या दाम्पत्याला दहा वर्षांचा मुलगा असून डॉ.पूनम या एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण करुन गेल्या वर्षभरापासून लोणीच्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे एम.डी.चे शिक्षण घेत होत्या. अतिशय मनमिळाऊ, सुस्वभावी, शांत आणि संयमी असलेल्या डॉ.पुनम तरुण डॉक्टरांच्या बॅचमध्ये आपल्या याच स्वभावगुणांमूळे सर्वांना परिचित होत्या.
रविवारी (ता.29) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी चिरायू रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरील आपल्या निवासस्थानातच पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. एका निष्णात आणि तरुण वयाच्या डॉक्टरांनी इतके टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त झाली. जालना येथील माहेर असलेल्या डॉ.पूनम यांच्या नातेवाईकांना जेव्हा त्यांच्या आत्महत्येबाबत कळविण्यात आले, तेव्हा त्यांना त्यावर विश्वासच बसत नव्हता. डॉ.पुनम या कोणतीही कृती करतांना संयमाने निर्णय घेत असत, त्यामुळे त्या आत्महत्या करणार नाहीत असा विश्वास त्यांच्या नातेवाईकांना होता.
रविवारी रात्री उशीराने मयत डॉ.पुनम यांचे नातेवाईक संगमनेरात आले होते. यावेळी त्यांनी आपली मुलगी अशाप्रकारे आपले जीवन संपविणार नाही असा विश्वास व्यक्त करीत घातपाताचा संशय व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढून कायदेशीर दृष्टीने ज्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे त्या केल्या जातील असा विश्वासही त्यांना दिला. मात्र मयत डॉ.पूनम यांचे नातेवाईक आपल्या घातपाताच्या संशयावर कायम असल्याने त्यांनी मयत डॉ.पूनम यांचे शवविच्छेदन औरंगाबादच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात (घाटी) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संगमनेर शहर पोलिसांच्या उपस्थितीत आज सकाळी त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे.
औरंगाबादेत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मयत डॉ.पूनम निघुते यांच्यावर त्यांच्या माहेरी जालना येथे अंत्यसंस्कार केले जाण्याची दाट शक्यता आहे. या घटनेनंतर संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी पोलिसांनी मयत डॉ.पूनम यांच्या शयनकक्षाचीही तपासणी करुन आवश्यक गोष्टी व त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर प्राप्त अहवालानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता असून त्यांच्या नातेवाईकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
अतिशय शांत, संयमी आणि सुस्वभाव असलेल्या डॉ.पूनम निघुते यांनी अचानक घेतलेला आत्महत्येचा निर्णय त्यांच्या परिचितांना धक्का देणारा ठरला आहे. एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण करुन वैद्यकीय सेवा करणार्या डॉ.पूनम यांनी गेल्या वर्षी उच्च शिक्षणासाठी प्रवरा मेडिकल कॉलेज येथे प्रवेश घेतला होता, तर त्यांचे पती डॉ.योगेश नवीन नगर रस्त्यावरील ताजणे मळा येथील आपल्या ‘चिरायू रुग्णालया’च्या माध्यमातून बालरुग्णांची सेवा करीत होते. डॉ.पूनम यांनी पालिकेच्या कॉटेज रुग्णालयात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातही सेवा बजावलेली असल्याने त्यांना ओळखणारा मोठा वर्ग संगमनेरात होता. त्यांनी अकस्मातपणे आपली जीवनयात्रा संपविल्याने संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.