संगमनेरच्या होलमराजाची मानाची काठी बुधवारी संगमनेरात! साळीवाड्यात होणार जंगी स्वागत; महात्मा फुले चौकात भरणार जत्रा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
होलम-काटकर समाजाच्या माध्यमातून दरवर्षी माघ पोर्णिमेला श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडोबारायाच्या दर्शनाला जाणारी व यात्रेच्या दुसर्या दिवशी देवाच्या शिखराची भेट घेवून परतणारी मानाची काठी बुधवारी (ता.23) संगमनेरात येत आहे. देवाची भेट घेवून परतणार्या या मानाच्या काठीचे संगमनेरात जल्लोषात स्वागत होत असते. गेली दोन वर्ष कोविडच्या कारणाने त्याला खंड पडलेला असतांना यंदा मात्र ही काठी वाजतगाजत भाविकांना दर्शन देणार आहे. याच दिवशी रात्री साळीवाड्यातील खंडोबा मंदिराच्या परिसरात असलेल्या देवाच्या आडात काठीचा गोंडा भिजवला जाणार आहे. काठीचा गोंडा आणि आडातील पाण्याचा स्पर्श होताच पाणी उसळते असा भाविकांचा दावा आहे. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी भाविक साळीवाड्यात मोठी गर्दी करतात.
होलमराजे खंडोबारायाचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या वाड्यात खंडोबारायाने काहीकाळ विश्राम केल्याच्या कथाही भाविक सांगतात. हा वाडा म्हणजेच आजच्या तेलीखुंट परिसरातील खंडोबारायाचे मंदिर आहे. ज्यावेळी मल्हारी मार्तंड पुन्हा जेजुरीकडे जाण्यास निघाले तेव्हा होलमराजाने पुन्हा भेटीची आशा व्यक्त केली. त्यावर देवाने दरवर्षी माघी उत्सवात आपली भेट होईल असे आश्वासन दिले. होलमराजे हयात असेपर्यंत दरवर्षी ते मानाचा झेंडा घेवून माघी उत्सवाला जेजुरीला जात व त्यांनी आणलेला मानाचा झेंडा जेजुरीच्या मंदिरावर मानाने फडकविला जात असे पौराणिक कथांमध्ये सांगितल्याचे भाविक सांगतात. होलमराजानंतरही ही परंपरा सुरू राहिली. त्यानंतर त्यांचे अनुयायी दरवर्षी गगनी भिडणार्या उंच काठीवर रंगबिरंगी पटका लावून ती वाजतगाजत जेजुरीला नेत, तेथे होलमराजाचे प्रतिनिधीत्व करणार्या या काठीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जात.
माघ पोर्णिमेच्या दुसर्या दिवशी संगमनेरच्या होलमराजाचे प्रतिनिधीत्त्व करणार्या काठी-पटक्याचे देवाच्या समोर नृत्य सादर झाल्यानंतर ही काठी मंदिराच्या शिखरी टेकविली जाते. यावेळी संपूर्ण जेजुरीगडावर भंडार्याची व खारीक-खोबर्याची उधळण होते. येळकोटऽ.. येळकोटऽऽ.. जय मल्हारच्या घोषात अवघी जेजुरीनगरी अक्षरशः दुमदुमून जाते. संगमनेरपासून जेजुरीपर्यंत आणि पुन्हा तेथून माघारी येण्याच्या प्रवासात होलमराजाच्या या मानाच्या काठीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी संकीर्तनाच्या आयोजनासह महाप्रसादाच्या पंक्तिही उठतात. गेल्याकाही वर्षांपासून काहींनी पंक्तिंची प्रथा बंद करण्याचा व त्या बदल्यात पैसे जमवण्याचा घाट घातला आहे. त्यातून भाविकांमध्येही नाराजीचा सूर दाटत आहे.
पौराणिक कथांमधून थेट देवाशी संबंध सांगितल्या गेलेल्या या मानाच्या काठीचे आज (ता.22) तालुक्यातील झोळे येथे आगमन झाले आहे. या काठीच्या अव्याहत प्रवासातील एक भाविक असलेल्या हौशीराम खर्डे यांच्या घरी काठीचा आजचा मुक्काम होणार आहे. यानिमित्त झोळ्यात भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुरु आहेत. बुधवारी सकाळी काठीचा प्रवास पुन्हा सुरु होवून प्रती जेजुरी समजल्या जाणार्या तालुक्यातील देवगड येथील खंडोबारायाचे दर्शन घेवून दुपारी चारपर्यंत ती संगमनेर खुर्द येथील संगमनेरचे द्वारपाल मारुतीरायाच्या मंदिरात पोहोचेल. तेथून सायंकाळी पाच वाजता तांदुळ बाजारातील खंडोबा मंदिर, सायंकाळी सहा वाजता महात्मा फुले चौकातील मारुती मंदिर व तेथून रात्री नऊ वाजता साळीवाडा येथील खंडोबारायाच्या मंदिरात या काठीचे आगमन होईल. साळीवाड्यातील खंडोबारायाच्या मूर्ती मंदिरासमोरील आडात आढळल्या आहेत. त्यामुळे जेजुरीहून परतलेल्या होलमराजाच्या काठीला असलेल्या पटक्याचा गोंडा आड्यातील पाण्यापर्यंत खाली सोडून त्याचा पाण्याशी स्पर्श घडविला जातो. यावेळी एव्हाना शांत असलेले आडातील पाणी मोठ्या प्रमाणात उसळ्या घेते असे भाविक मानतात. काही मिनिटांचा हा देव आणि भक्त भेटीचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दरवर्षी शेकडों संगमनेरकर साळीवाड्यातील खंडोबा मंदिरात गर्दी करतात.
संगमनेरच्या होलमराजाच्या काठीला माघी उत्सवात जेजुरीत मोठा मान आहे. खंडोबारायांचे निस्सीम भक्त असलेल्या होलमराजाची प्रतिनिधी म्हणून दरवर्षी वाजतगाजत जेजुरीला जाणारी व शिखरी लागून माघारी येणारी ही मानाची काठी बुधवारी रात्री नऊ वाजता साळीवाड्यातील खंडोबा मंदिरात येणार आहे. यावेळी काठीचा पटका देव बाहेर काढण्यात आलेल्या आडात सोडून पटक्याचा गोंडा आणि आड्यातील पाण्याचा स्पर्श घडविला जातो. यावेळी आड्यातील शांत पाणी उचानक उसळ्या घेते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या सोहळ्यासाठी साळीवाडा खंडोबा मंदिरात मोठी तयारी करण्यात आली आहे.