वेलनेस संस्थेचे आरोग्याबाबतचे कार्य अभिनंदनीय ः पिचड राजूर येथे श्री स्वामी समर्थ सेवा संस्था व वेलनेसच्या सहकार्यातून आरोग्य शिबिर

नायक वृत्तसेवा, राजूर
देशसेवेसाठी आरोग्य हा विषय निवडून जनतेचे आरोग्य अबाधित ठेवून चालणारे वेलनेस संस्थेचे कार्य अभिनंदनीय आहे. निरोगी जीवनासाठी लागणारा ऑक्सिजन निसर्गतः मिळण्यासाठी एक तरी झाड लावा व जगवा, असे आवाहन आदर्श सरपंच हेमलता पिचड यांनी केले.

श्री स्वामी समर्थ सेवा संस्था व वेलनेस फॅमिली बीड ड्रीम टीम यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वामी समर्थ संस्थेचे सचिव शांताराम काळे, जागतिक आरोग्य सल्लागार विजय नागरगोजे, मनीषा ढाकणे, राम कदम, राम पन्हाळे, रमाकांत डेरे उपस्थित होते.

जागतिक आरोग्य सल्लागार विजय नागरगोजे यांनी आरोग्याबद्दल सखोल व महत्त्वपूर्ण माहिती दिली. निर्जीव बंगले, गाड्या यांची आपण फार काळजी घेतो पण आरोग्याची काळजी घेत नसल्याने आरोग्याचा प्रश्न जटील होत चालला असल्याचे अधोरेखित केले. योग्य काळजी घेऊन व्यायाम व आहार यांच्या मदतीने आरोग्य घडविण्यासाठी त्यांनी तळमळीने माहिती देत आनंदी व निरोगी राहण्याचा मूलमंत्र दिला. राम कदम यांनी आरोग्याच्या बाबतीत बॅलन्स न्यूट्रिशन, जेवणाच्या वेळा, आराम, ताणतणावाचे व्यवस्थापन, मनाचे व्यवस्थापन याबाबत योग्य मार्गदर्शन केले. महिला जागतिक सल्लागार मनीषा ढाकणे यांनी पूर्वीची जीवनपद्धती व आत्ताच्या जीवन पद्धतीतील फरक उदाहरणांद्वारे स्पष्टपणे मांडला. पूर्वीच्या कामांमध्ये व्यायाम होतच होता. परंतु आता सुविधांमुळे मशिनरी आल्या, व्यायाम पूर्णपणे बंद होऊन अनेक आजार वाढीला आपण निमंत्रण देत असल्याचे सांगितले. याचबरोबर बदललेल्या जीवनपद्धतीमुळे आरोग्याचा प्रश्न सर्वांनाच सतावतोय. 20 टक्के व्यायाम व 80 टक्के आहारात बदल केल्याने शरीर निरोगी राहू शकते असे शेवटी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सर्व शिबिरार्थींचे बॉडी मास इंडेक्स, मसल पॉवर, फॅट्सचे प्रमाण, शारीरिक वय व पेशींवरून असणारी वय आदी चाचण्या करुन मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्या मंजुषा काळे यांनी केले तर स्वतःचे अनुभव कथन करत सचिव शांताराम काळे यांनी सर्व शिबिरार्थींना मार्गदर्शन केले आणि शेवटी आभार मानले. यावेळी अरुण तपासे, सुहास हराळे, शिवराज कदम, शिवाजी नरके, राजू पन्हाळे, हबीब मणियार, देविदास शेलार, नितीन चोथवे, रजनी टिभे आदी कोविड नियम पाळून उपस्थित होते.
