जिल्ह्याची कोविड सरासरी पुन्हा वाढली! संगमनेर तालुक्यातील सरासरीत मात्र घट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य सरकारने कोविडच्या कठोर निर्बंधांतून शिथिलता दिल्यानंतर जनजीवन हळूहळू पर्वपदावर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याची रुग्णसंख्या सहाशेच्या आत विसावली होती. परंतु आज (गुरुवार ता.10) पुन्हा उसळी घेतली असून, 868 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज घट होवून अवघे 55 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी रुग्णसंख्या सहाशेच्या खाली राहिली होती. परंतु आज रुग्णसंख्येने पुन्हा उसळी घेतली असून 868 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांतून सर्वाधिक 111 रुग्ण नेवाशामध्ये आढळले आहेत. त्या खालोखाल पाथर्डी 95, शेवगाव 83, पारनेर 74, श्रीगोंदा 73, कोपरगाव 69, अकोले 68, संगमनेर 55, नगर ग्रामीण 43, महापालिका क्षेत्र 39, कर्जत 37, राहुरी 36, श्रीरामपूर 34, राहाता 22, जामखेड 11, इतर जिल्हा 11, भिंगार कॅन्टोमेन्ट 6 आणि मिलिटरी हॉस्पिटल 1 असे रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 2 लाख 70 हजार 430 तर संगमनेर तालुक्याची 22 हजार 331 झाली आहे.
