राहुरी विद्यापीठात चिमणी, पोपट, भारद्वाज पक्ष्यांची संख्या वाढली मागील आठ वर्षांपासून हरीत सेनेकडून विद्यापीठ परिसरात पक्षी गणना

नायक वृत्तसेवा, राहुरी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषी विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात आली. यावर्षी चिमणी, पोपट, भारद्वाज पक्ष्यांची लक्षणीय वाढ; कावळा, जांभळा, शिंजीर, खंड्या (किंगफिशर) यांची संख्या तुलनेने कमी दिसली. मोर, घार, साळुंकी यांची संख्या स्थिर आहे. मागील आठ वर्षांपासून हरीत सेनेचे सचिव बाळासाहेब डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी गणनेचा उपक्रम सुरू आहे.

दरवर्षी ठरलेल्या भागातच गणना केली जाते. चार किलोमीटर चौरस प्रक्षेत्रात तीन शिक्षक, 63 विद्यार्थी सहभागी झाले. बारा गटात पाच-सहा सदस्य, एक गटप्रमुख यांनी सकाळी पावणेसात ते सव्वाआठ वाजेपर्यंत एकाचवेळेस गणना सुरू करुन थांबविली. मुळा कालव्यापासून पूर्व-पश्चिमेकडे, उद्यानविद्या विभाग, सडे रस्ता, धन्वंतरी विभाग, शेडगे वस्ती, धरमाडी टेकडी, विद्यापीठ वसाहत परिसर, विद्यालय परिसरात गणना झाली. तत्पूर्वी विद्यार्थांना वर्गात स्क्रीनवर रूटची माहिती, गणना करण्याची पद्धत, महाराष्ट्रात आढळणार्‍या पक्षांची सचित्र ओळख, छापील रंगीत प्रिंट, मोबाईलमध्ये फोटो अशी तयारी करण्यात आली. दुर्बिन, कॅमेरा, पक्षांची चित्रे यांचा वापर करून, पक्ष्यांच्या नोंदी केल्या.

या उपक्रमात एनसीसीचे संतोष जाधव, शिक्षक तुकाराम जाधव, विद्यार्थी अध्वर्या आहेर, गायत्री बेल्हेकर, साक्षी कोतकर, प्रचिती भिंगारदे, स्नेहल पवार, अक्षदा भुजाडी, ओंकार गिते, अलोक गवळी, ओम धोंडे, आदित्य दोंड, साईराज कोरडे, आदित्य वने, ओंकार वाणी, समर्थ कारंजकर, प्रणव तोडमल, यश ताकटे यांनी भाग घेतला. मुख्याध्यापक आशा धनवटे, उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे, पर्यवेक्षक संदेश वीसपुते, संस्थेचे सभापती डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने यांनी सहकार्य केले.

गणनेतील प्रमुख पक्षी, त्यांची संख्या अशी : पोपट (118), भारद्वाज (50), चिमणी (328), कावळे (218), बगळे (300), बुलबुल (59), खंड्या (27), साळुंकी (149), होला (77). एकूण पक्षी गणना (2708).

जास्त पाऊस, स्थलांतर, शिकारी पक्षी यामुळे पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम होतो. कृषी विद्यापीठात पक्ष्यांना खाण्यासाठी फळबागा आहेत. रखवालदार असल्याने माणसांकडून पक्ष्यांची शिकार होत नाही. त्यामुळे पक्षांची संख्या वाढण्यासाठी पोषण वातावरण आहे.
– बाळासाहेब डोंगरे (सचिव, हरित सेना)

Visits: 201 Today: 1 Total: 1801417

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *