शेतकर्‍यांची कांदा विक्रीसाठी लगबग सुरू अनुदान कालावधी महिनाभर वाढविण्याची होतेय मागणी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सरकारने 31 मार्च अखेर बाजार समितीत विक्रीसाठी येणार्‍या कांद्याला साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल इतके अनुदान घोषित केलेले असल्याने सरकारने कांद्याला साडे तीनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले. त्यामुळे शेतकर्‍यांची दोन दिवसांत कांदा विक्रीसाठी आणण्याची लगबग सुरू आहे. मात्र, सरकारने अनुदान कालावधी आणखी महिनाभर वाढवावा, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

यावर्षी सगळीकडे कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल हजार ते अकराशे रुपये दर मिळत आहे. जिल्ह्यात आगास कांदा काढणीला वेग आला आहे. सरकारने 31 मार्च अखेरर्पंत बाजार समितीत विक्रीसाठी येणार्‍या कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे अनुदान मिळण्यासाठी शेतकरी आपला कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत विकण्याच्या लगबगीत दिसत आहे.

त्यात मागील आठवड्यात शेतकर्‍यांच्या शेतात जागेवर व्यापारी चांगल्या कांद्याला जास्तीत जास्त साडेनऊशे रुपये प्रतिक्विंटल दर देऊन कांदा खरेदी करीत होते. पण आता शंभर ते दीडशे रुपये प्रतिक्विंटल दरात घसरण होऊन, आता प्रतिक्विंटल साडेसातशे ते आठशे रुपये दराने चांगल्या कांद्याला भाव देत व्यापारी खरेदी करीत आहे. त्यात या भागात मार्चमध्ये पाऊस झाला. त्यामध्ये शेतकरी धास्तावले असून भविष्यात फार काळ कांदा टिकणार नाही अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आहे ते दर पदरात पाडून घेताना शेतकरी दिसत आहेत. व्यापारी देखील पावसाचे कारण सांगून कांदा दर पाडताना दिसत आहेत.

जरी सातशे ते नऊशे रुपयांपर्यंत चांगल्या कांद्याला दर मिळत आहे आणि सरकारकडून प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान मिळणार आहेत. त्यामुळे चांगला कांदा जर कृषी उत्पन्न बाजार समितीत नऊशे रुपये गेला, त्यात सरकारच्या साडेतीनशे अनुदान म्हणजे प्रति क्विंटल साडेअकराशेपर्यंत दर मिळून शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ मिळून दिलासा मिळेल. सरकारच्या घोषणेप्रमाणे अनुदान रक्कम मिळण्याची मुदत दोन दिवसांची असल्याने शेतकरी दोन दिवसांत कांदा बाजार समितीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप कांद्याच्या दरात सुधारणा झालेली नसल्याने सरकारने अनुदानाची मुदत किमान एक महिन्याने वाढवून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Visits: 115 Today: 1 Total: 1113960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *