कारवाई होवूनही ‘लालपरी’ अडखळलेलीच! बडतर्फांना दाद मागण्याच्या अजूनही दोन संधी

नायक वृत्तसेवा, नगर
एसटीच्या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू करून सुमारे साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला. मागण्या रास्त असल्या, तरी संपामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही अनेक कर्मचारी कामावर हजर होत नाहीत. त्यामुळे अखेर निलंबनाचे हत्यार उपसण्यात आले. मात्र, कर्मचारी त्यालाही दाद देईनात. ग्रामीण भागाला वरदान असलेली ही लालपरी यामुळे अडखळली आहे.

आंदोलनामुळे एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजपर्यंत 1 हजार 171 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. अनेक गावांत एसटी जात नसल्याने जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही बसस्थानकांमधून खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटाका आगामी काळात एसटीला बसणार आहे. संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाचे सुमारे 45 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

सर्व कर्मचार्‍यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. दाद न देणार्‍यांचे निलंबनही केले जात आहे. आतापर्यंत 325 जणांवर बडतर्फीची कारवाई झाली. 306 जणांचे निलंबन करण्यात आले. बडतर्फ कर्मचार्‍यांना विभागनियंत्रक व मध्यवर्ती कार्यालयात दाद मागण्याची संधी असल्याचे कर्मचार्‍यांमधून बोलले जात आहे. याबाबत एसटीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती घेतली असता, बडतर्फ कर्मचार्‍यांना संधी मिळते; परंतु या प्रकरणात तूर्त आम्हालाही सांगणे मुश्कील आहे, असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. सध्या 157 बसच्या माध्यमातून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील प्रवाशांना सुविधा पुरविली जात आहे. या माध्यमातून रोज सुमारे 300 फेर्‍या होत आहेत. 44 हजार किलोमीटरचा प्रवास होतो. त्यातून एसटीला सुमारे 20 लाखांचे उत्पन्न मिळते. रोज 26 हजार प्रवाशांना इच्छित स्थळी पोचविण्याचे काम एसटी करीत आहे.

दृष्टीक्षेपात कर्मचारी..
3,499 ः एकूण कर्मचारी
1,171 ः हजर
1,983 ः गैरहजर
116 ः आठवडा सुट्टीवरील
30 ः पगारी सुट्टीवरील कर्मचारी.

Visits: 87 Today: 1 Total: 1110866

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *