एसटी कर्मचार्‍यांना गुलामासारखे वागवण्याचे काहींचे धोरण : आ. पडळकर संगमनेर बस आगाराला भेट; कर्मचार्‍यांना मानसिक व आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षांपासून काही लोकांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे रक्त शोषण करण्याचे काम सुरु आहे. हा प्रकार यापुढे कदापी होवू देणार नाही. विलीनीकरणाच्या प्रश्नापासून बाकीच्या सगळ्या विषयांवर आमदार सदाभाऊ खोत आणि आपण राज्यातील एसटी कर्मचार्‍यांसोबत ठामपणे उभे आहोत. कर्मचार्‍यांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या, महिला कर्मचार्‍यांना दिली जाणारी वागणूक यातून कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरु असून त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करुन देण्यासह त्यांच्या आर्थिक व मानसिक स्थैर्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्यव्यापी संप पुकारला होता. कोणत्याही संघटनेच्या बॅनरशिवाय सुरु झालेल्या या संपाचे नेतृत्त्व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सदाभाऊ खोत यांनी केले होते. प्रदीर्घ काळ चाललेल्या या संपाबाबत तत्कालीन आघाडी सरकारने विलीनीकरणाचा मुद्दा वगळता अन्य काही गोष्टी मान्य केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यावेळी संप स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर घडले व त्यावेळी विरोधी गटात असून या संपाचे नेतृत्त्व करणारे आमदार पडळकर आज सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी झाल्याने त्यांनी संगमनेर बसस्थानकाला भेट देवून कर्मचार्‍यांशी साधलेल्या संवादाला आणि दिलेल्या आश्वासनांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

आज (ता.9) सकाळी दहाच्या सुमारास पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाताना त्यांनी अचानक संगमनेर बसआगाराला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचार्‍यांशी संवाद साधताना वरील प्रतिपादन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांच्या सर्व मागण्यांबाबत आपण व आमदार सदाभाऊ खोत दोघेही पाठपुरावा करीत आहोत. यासाठी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आपण भेट घेतली असून आपल्या मागण्यांचे वेळोवेळी निवेदनही त्यांना दिले आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन कर्मचार्‍यांनी उपोषणाचे आंदोलन केले होते. त्यावेळीही कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली असून त्यातून राज्यातील सर्व आगाराच्या कर्मचार्‍यांच्या मागण्यांचा आढावा घेण्याचा निर्णय झाला असून आपण स्वतः त्याचा पाठपुरावा करीत असल्याची माहिती त्यांनी उपस्थित कर्मचार्‍यांना दिली.

राज्यातील काही वरीष्ठ अधिकार्‍यांची मानसिकता राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे शोषण करण्याची, त्यांच्यावर अन्याय करण्याची व त्यांना गुलामासारखी वागणूक देण्याची असून राज्यभर निर्माण झालेली ही साखळी तोडण्यासाठी त्या विरोधात संघटित लढा देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कर्मचार्‍यांच्या कष्टावर पगार मिळवणारी अशी मंडळी कर्मचार्‍यांना सतत अडचणीत आणण्याचे कारस्थान करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. गेल्या दिवाळीत झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला कर्मचार्‍यांचे पगार केले जातील असे आश्वासन दिले होते, मात्र चालू महिन्यातील पगार अद्यापही झाला नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यावर आपण तत्काळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून पुन्हा असा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍यांच्या चुकीच्या ड्युट्या लावणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, काही कर्मचार्‍यांच्या चुकीच्या ठिकाणी बदल्या करणे अशी वेगवेगळी कारस्थाने रचली जात असून त्यातून कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा पद्धतशीर उप्रकम सुरु असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला. त्या विरोधात आपण कर्मचार्‍यांसोबत ठामपणे उभे असून महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांच्या मानसिक व आर्थिक स्थैर्यासाठी काल, आज आणि उद्याही प्रसंगी लढा देण्याची तयारी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी कर्मचार्‍यांना दिली. यावेळी भगवान गिते, नंदकुमार कानकाटे यांच्यासह एसटी महामंडळाच्या संगमनेर आगारातील कर्मचारी व भाजपाचे अमोल खताळ, दीपक भगत, भारत गवळी, डॉ. अशोक इथापे, हरिश्चंद्र चकोर, भागवत शिंदे यांच्यासह कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 199 Today: 2 Total: 1115954

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *