‘मंत्र्यांची स्तुती’; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला पडली महागात! समाज माध्यमात बातमी केली शेअर; नेटकर्‍यांनी कानउघाडणी करुन दिली कर्तव्याची जाणीव..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाज माध्यमात वावरताना आपल्या हातून घडलेली एखादी चूक आपल्याला कशा पद्धतीने अडचणीत आणू शकते याचे जिवंत उदाहरण संगमनेरातून समोर आले आहे. समाज माध्यमातून एका व्हाटसअ‍ॅप समूहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चक्क कार्यकारी अभियंत्यांनी मंत्र्यांची स्तुती करणारी राजकीय बातमी शेअर केल्याने ते प्रचंड ‘ट्रोल’ झाले. त्यांच्या या कृतीनंतर समूहातील अनेक सदस्यांनी त्यांच्यावर जोरदार आक्षेप घेत त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. या सर्व प्रकारानंतर उशीराने आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर ‘त्या’ अभियंत्याने अनावधानाने दुसर्‍या समूहाऐवजी या समूहात ‘ती’ शेअर झाल्याची सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत सदरची बातमी त्या समूहातून ‘डिलिट’ही केली. परंतु, तत्पूर्वीच अनेकांनी या सर्व चर्चाक्रमाचे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते. त्यामुळे ‘त्या’ समूहातील चर्चा कार्यकारी अभियंत्यांनी ‘डिलिट’चा प्रयोग करुन थांबविली असली तरीही त्यांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाही.

राज्याचे महसूल मंत्री व संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांचा लेखाजोखा असणारी बातमी शहरातील एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. सदरची बातमी नामदार थोरात यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर ढोबळमानाने हजारो कोटी, शेकडो कोटी आकडे अशा स्वरुपात मांडलेली असल्याने आणि विशेष म्हणजे सदरची बातमी राजकीय हेतूने नामदार थोरात यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेली असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने ती अशा पद्धतीने समाज माध्यमात शेअर करणे व एकाप्रकारे संबंधित राजकीय व्यक्तीचा प्रचार करणे अनेक नेटकर्‍यांना खटकले.

या त्यांच्या पोस्टनंतर एका नेटकर्‍याने तत्काळ प्रतिक्रिया देत महोदय, आपण शासनाचे सेवक आहात की संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचे? असा सवाल उपस्थित केला. त्यावर काही सदस्यांनी त्यांच्या या प्रश्नाला समर्थन दर्शवीत संबंधित अधिकार्‍याकडून त्यावर खुलासा मिळविण्याचा प्रयत्न केला. एका नेटकर्‍याने तर थेट आपण मंत्र्यांचे कार्यकर्ते आहात का? असा सवालच उपस्थित केला. इतक्या मोठ्या प्रमाणात हजारो कोटींचा निधी आणला असेल तर ‘श्वेतपत्रिका’ काढा अशी मागणी करीत एकाने थेट ही सर्व कामे बोगस असल्याचा आरोपही केला. एकाने पूर्वी अधिकार्‍यांवर ते राजकीय कार्यकर्ते असल्याचा आरोप होत असत. आता मात्र अधिकारीच आपण कार्यकर्ते असल्याचे सिद्ध करु लागल्याचा गंभीर आरोप केला. इथवरच्या चर्चेत संबंधित अधिकार्‍याने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने काहींनी संतापही व्यक्त केला. बराचवेळ याच विषयावर ‘त्या’ समूहात वेगवेगळ्या वळणाची चर्चा सुरू राहिली. हा प्रकार शासकीय सेवा आणि शर्तींचा भंग असल्याचेही या समूहात बोलले गेले.

‘त्या’ बातमीच्या शेअरिंगवरुन पेटलेला विषय इथवर पोहोचल्यानंतर संबंधित बातमी शेअर करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील यांची चर्चेत पुन्हा ‘एन्ट्री’ झाली. यावर स्पष्टीकरण देताना ‘ते म्हणाले की सदरचा संदेश हा चुकून या समूहात शेअर झाला आहे. बातम्या, माहिती, तक्रारी, फेसबुक, व्हाटसअ‍ॅप इत्यादींवरुन सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना पाठवाव्या लागतात. त्यातून सर्व विभागांना माहिती मिळते असा कामकाजाचा प्रघात आहे,’ असे. त्यावरही काहींनी येथे नाही तर कोठे तरी हा प्रचार होणारच होता आणि तेही हजारो आणि शेकडो कोटींच्या उल्लेखासह असेही त्यांना सुनावले. एकाने संबंधित अधिकार्‍याला उद्देशून तुम्हाला मंत्र्यांनी आपल्या प्रचार यंत्रणेत कामाची ऑफर दिली असल्याची मिश्किल टिप्पणीही केली. त्यावर त्यांनी हात जोडल्याचा ‘इमोजी’ टाकून चर्चेतून माघार घेतल्याचे दिसून आले. या सगळ्या घडामोडीनंतरही या विषयावर चर्चा मात्र सुरू असताना एका ज्येष्ठ पत्रकाराने ‘मखलाशा’ म्हणून संबंधित अधिकार्‍याचा उल्लेख केला तर काहींनी वारंवार आपल्या निष्ठेची आणि कर्तव्याची जाणीवही करुन दिली. भविष्यात हे अधिकारी भाषणबाजी करताना राजकीय मंचावर आढळले तर आश्चर्य वाटायला नको, अशीही प्रतिक्रिया एकाने नोंदवली. यापुढे सत्ताधारी मंडळींची ‘प्रेसनोट करुन मिळेल सार्वजनिक बांधकाम विभाग’ असा उपरोधिक टोलाही एकाला लगावला. 

यानंतर हा विषय हजारो, शेकडो कोटी रुपये खर्च करुन झालेल्या या सर्व कामांच्या दर्जावर आणि संगमनेरात फोफावलेल्या ठेकेदारीवर जावून पोहोचला. यावरही काही नेटकर्‍यांनी उघडपणे प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्यांनी कामाचा दर्जा तपासायचा असतो तेच जर राजकीय प्रचारयंत्रणेत सहभागी झाले असतील तर काय करावे असा सवाल उपस्थित केला. एका नेटकर्‍याने या सर्व गोष्टींचा स्क्रीनशॉट काढून निवडणूक आयोगाकडे संबंधित अधिकार्‍याची तक्रार करुन त्यांची येथून तत्काळ बदली करण्याची सूचना विरोधी पक्षातील स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांना केली.

एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या उतावळेपणामुळे घडलेला हा सगळा घटनाक्रम संगमनेरातील ‘व्यवस्था परिवर्तन’ या समूहात आज सकाळीच सुरू झाल्याने अनेकांना आजचा दिवस खमंग मेजवानीचा ठरला. या चर्चेच्या गुर्‍हाळातून राजकीय पुढार्‍यांच्या प्रभावात सर्वच शासकीय व निम्नशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने गुरफटलेल्या असतात याचं दर्शनही सामाजिक माध्यमातील या व्हाटसअ‍ॅप समूहातील आजच्या चर्चेतून घडले.

Visits: 192 Today: 4 Total: 1103237

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *